नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-6 परिसरातील तुलसी भवन इमारतीच्या सी-विंगचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा बळी गेला आहे. तर अन्य एक महिला आणि एक मजूर कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ.डी.वाय पाटील रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे. (Husband dies, wife injured in Nerul incident; Vadettivars demand action against the culprits)
20 वर्षापुर्वी नेरूळ सेक्टर-6 येथे तुलसी भवन ही चार मजली इमारत 12.5 टक्के योजनेतून उभारण्यात आली आहे. या इमारतीत तिसर्या मजल्यावर म्हात्रे यांच्या घरात लादी बसवण्याचे काम बुधवारी (ता.23) रात्रीच्या वेळी सुरू होते. त्या ठिकाणी तीन कामगार काम करीत होते. काम करीत असताना अचानक तिसर्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने खालील मजल्याचे दोन स्लॅब देखील कोसळले. यात बाबासो शिंगाडे (वय 55) आणि राम नायक (वय 57) या मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर शोभा शिंगाडे (वय 47) आणि अजीज शेख (वय 48) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गुरुवारी सकाळपासून अग्निशमन दलाच्या जवानांनी तुलशी भवन येथील दुर्घटनेत कोसळलेल्या ढिगारा उचलल्याचे काम तातडीने सुरू केले आहे. या इमारतीमध्ये असलेल्या अन्य कुटुंबांना येथील दर्शन दरबारमध्ये तात्पुरता स्वरुपात राहण्याची सोय करण्यात आली आहे. तर यातील काही कुटुंबांसाठी नेरुळ सेक्टर-9 येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक केंद्रात तात्पुरता स्वरुपात राहण्याची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचा : नवी मुंबईमधील नेरुळ येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; 1 एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी
दोषींवर कारवाई करा-वडेट्टीवार
नेरुळ येथील घटना ही दुर्दैवी असून, मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने सरकारने मदत उपलब्ध करून द्यावी. दुर्घटनाग्रस्त इमारत अत्यंत धोकादायक असल्याची माहिती मिळाली आहे. धोकादायक इमारतीची माहिती असूनसुद्धा प्रशासनाने यावर काहीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करत या घटनेची चौकशी करून सरकारने संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करुन केली आहे.
हेही वाचा : Mumbai Crime: खलबत्याने ठेचून पत्नीने केली पतीची हत्या; मीरारोडमधील घटनेमुळे खळबळ
माजी आ.संदीप नाईक यांची भेट
ऐरोलीचे माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी नेरूळ सेक्टर-6 येथील स्लॅब कोसळलेल्या तुलसी भवन सोसायटीला गुरुवारी भेट दिली. जिल्हाध्यक्ष नाईक यांनी नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या घर आणि इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे आवाहन केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती गरजेचे असल्याचे नाईक यांनी मत मांडले.