पती-पत्नी आणि ड्रग्ज! डोक्यात दगड घालून केली पतीची हत्या

वांद्रे येथे ४० वर्षांच्या पतीची पत्नीने हत्या केल्याची घटना घडली. विजय सिंग असे मृत पतीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मेहरुनिसा विजय सिंग हिच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. हल्ल्यात ती जखमी झाल्याने तिला शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे एसीपी दत्तात्रय भरगुडे यांनी सांगितले.

काय आहे घटना

विजय सिंग हा त्याची पत्नी मेहरुनिसा आणि सहा वर्षांची मुलगी हिनासोबत वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील फुटपाथवर राहत होता. दोघेही पती-पत्नी ड्रग्जच्या आहारी गेले होते. दोन दिवसांपूर्वी ते दोघेही रात्री वांद्रे येथील स्कायवॉकवर झोपले होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. याच वादानंतर विजयने मेहरुनिसावर दगडाने हल्ला केला. त्यात ती जखमी झाली होती. त्यानंतर तिने त्याच दगडाने विजयच्या डोक्यात मारहाण केली. त्यात विजय हा गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेनंतर ती तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह पळून गेली. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजयला पोलिसांनी भाभा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच मेहरुनिसाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. हल्ल्यात ती जखमी झाल्याने तिला नंतर शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हिनाच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला. तिने तिच्या आई-वडिलांमध्ये भांडण पाहिले होते. सुरुवातीला वडिलांनी आईवर हल्ला केला, त्यानंतर आईने दगडाने वडिलांच्या डोक्यात हल्ला केल्याचे तिने सांगितले. तिच्या जबानीनंतर वांद्रे पोलिसांनी मेहरुनिसाविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच तिला या गुन्ह्यांत अटक केली जाईल, असे एसीपी दत्तात्रय भरगुडे यांनी सांगितले.

हेही वाचा –

दिलासादायक! राज्यात आतापर्यंत २१,१७९ पोलिसांनी केली कोरोनावर मात