शिधापत्रिका नसली तरी धान्य द्या!

सर्वात मुख्य मागणी म्हणजे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा लोकांसाठी अन्नाची व्यवस्था करा ही मागणी प्रकर्षाने मांडण्यात आली आहे.

मुंबईतील अनेक झोपडीपट्टी भाग आणि वस्त्यांमधून आता जीवनावश्यक गोष्टींच्या पुर्ततेसाठीची मागणी प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहे. मुंबईतील एकुण ३० वस्त्यांमधून जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे. रोजच्या भेडसावणाऱ्या समस्या या नागरिकांनी प्रशासनासमोर मांडत लवकरात लवकर त्याची पुर्तता करण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बेघर, स्थलांतरीत आणि रोजंदारीवर काम करणारे मजदूर यांच्यावतीने काही स्थानिक संघटनांनी या मागण्या जिल्हाधिकारी समितीसमोर मांडल्या आहेत. त्यामध्ये सर्वात मुख्य मागणी म्हणजे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा लोकांसाठी अन्नाची व्यवस्था करा ही मागणी प्रकर्षाने मांडण्यात आली आहे.

३० वस्त्यांमध्ये असलेल्या गैरसोयीबाबत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले

मजदूर, श्रमिक वर्गासाठी शिधावाटप करा, अन्नाची व्यवस्था तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी घर बचाओ, घर बनाओ आंदोलन, होमलेस कलेक्टिव्ह, सुधाकर ओलवे आणि सुमित वजाले यांनी एकत्रितपणे ही मागणी उच्च न्यायालयात केली होती. मुंबईतील ३० वस्त्यांमध्ये असलेल्या गैरसोयीबाबत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनाही पत्र लिहिण्यात आले होते. पानी शौचालय आणि शिधावाटपाच्या मुद्द्यावर नायब तहसीलदार संजय किरवे यांच्या अध्यक्षतेत एक बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला शिधावाटप केंद्राचे अधिकारीही उपस्थित होते.

खाण्या पिण्याच्या वस्तूंची जास्त मागणी

या बैठकी दरम्यान जय अंबे नगर चेंबूर येथे प्रत्येक दिवशी खाण्याची पाकिटे मिळावीत अशी मागणी करण्यात आली आहे. रफी नगर, बाबा नगर गोवंडीतूनही खाण्याच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. तर मंडाला, मानखुर्द याठिकाणी पाण्याच्या समस्येमुळे दोन तात्पुरत्या स्टॅण्डपोस्टची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नगर मानखुर्द, इंदिरा नगर आणि भीम नगर याठिकाणाहूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.