मोहित कंबोज यांच्या घराची महापालिका पथकाकडून झाडाझडती

पालिकेच्या कारवाईनंतर मोहित कंबोज यांनी पालिका सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप केला आहे.

illegal construction bmc officer reached atmohit kamboj home
मोहित कंबोज यांच्या घराची महापालिका पथकाकडून झाडाझडती

मुंबई -: भाजपचे युवा नेते मोहित कंबोज यांच्या इमारतीमध्ये बुधवारी दुपारी बारा वाजता महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे पथक धडकले. या पथकाने लागलीच इमारतीतील मोहित कंबोज यांच्या राहत्या घरांची झाडाझडती घेतली. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेऊन पाहणी करून आणि कागदपत्रांची तपासणी करून पालिकेचे पथक पुन्हा पालिका कार्यालयाकडे रवाना झाले.

मोहित कंबोज हे सांताक्रूझ ( पश्चिम) एस. व्ही. रोड येथील १४ मजली इमारतीमध्ये राहतात. या इमारतीमधील चार मजले ते व त्यांचे कुटुंबीय वापरत असल्याचे समजते. पालिकेच्या पथकाने कंबोज यांच्या घरातील बांधकामाची पाहणी केली. तसेच, सदर इमारतीचा प्लान, आराखडा वगैरे आदींबाबतची कागदपत्रे तपासली. आता पालिकेच्या पथकाकडून सदर पाहणीचा एक अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याबाबत घडलेल्या घटनाप्रकारानुसार कंबोज यांच्या घरात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास त्यांना त्यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी सांगण्यात येईल. त्यासाठी मुदतही दिली जाण्याची शक्यता आहे.

मात्र त्यानंतरही त्यांनी अनधिकृत बांधकाम न हटविल्यास त्यावरील कारवाईबाबत पालिका प्रशासन योग्य तो निर्णय घेईल. मात्र अनधिकृत बांधकाम नेमके कुठे झाले आहे की नाही, याबाबत पालिकेकडून संबंधीत अधिकाऱ्यांकडून माहिती देण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या एच / पश्चिम विभाग खार (प.) विभाग कार्यालयातर्फे नोडल अधिकारी यांनी मोहित कंबोज यांच्या सोसायटीला १८८८ च्या कायद्याने कलम ४८८ नुसार नोटीस बजावली आहे. त्यांच्या सोसायटीत व घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचा पालिकेचा संशय आहे.

सूडबुद्धीने कारवाई -: मोहित कंबोज

पालिकेच्या कारवाईनंतर मोहित कंबोज यांनी, पालिका सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप केला आहे. मात्र ‘तुम्ही काहीही करा, मी झुकणार नाही’, अशी भूमिकाही त्यांनी सुरुवातीलाच घेतली आहे. जर प्रकरण वाढले तर ते पालिकेची कारवाई रोखण्यासाठी राणेंप्रमाणेच न्यायालयात धाव घेऊ शकतात. कदाचित त्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


मास्क घालण्याचा कंटाळा करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची