… म्हणून अंबानींच्या शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी; आरोपीच्या अटकेसाठी पोलीस गुजरातला रवाना

मुंबईतील बीकेसी येथील धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी एका इसमाने दिली. त्याच्या धमकीनंतर या शाळेत आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. परंतु, काही तासाने स्वत: आरोपीनेच फोन करत प्रसिद्धीसाठी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याचे सांगितले.

मुंबईतील बीकेसी येथील धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी एका इसमाने दिली. त्याच्या धमकीनंतर या शाळेत आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. परंतु, काही तासाने स्वत: आरोपीनेच फोन करत प्रसिद्धीसाठी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याचे सांगितले. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरातला रवाना झाले आहे. (in bkc For publicity gujarat guy created a stir by threatening to plant a bomb at dhirubai ambani international school)

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात इसमाने सोमवारी दुपारी धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेच्या लँडलाइन नंबरवर फोन केला. त्यावेळी त्याने शाळेत टाइम बॉम्ब पेरल्याचे सांगितले आणि कॉल कट केला. अज्ञात इसमाच्या फोननंतर सुरक्षा यंत्रणा आणि शाळा प्रशासनाची काही वेळेसाठी तारांबळ उडाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेची माहिती बीकेसी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण शाळेची तपासणी केली.

बीकेसी येथील धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत पोलिसांनी तपासणी केली असता शाळेत काहीही संशयास्पद वस्तू आढळून आले नाही. मात्र, धमकीच्या या कॉलमुळे शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही तासांनंतर अज्ञात इसमाने दुसरा कॉल शाळेच्या गेटवर केला. तिथे त्याने दावा केला. विक्रम सिंह असे त्याचे नाव असून, तो गुजरातचा रहिवासी आहे. तसेच, त्याने हा धमकीचा कॉल प्रसिद्धी मिळविण्यासाठी केल्याचे सांगितले. धमकीच्या कॉलमुळे पोलीस त्याला पकडतील आणि त्याचे फोटो आणि नाव प्रसारमाध्यमांमध्ये छापून येईल आणि संपूर्ण देशात त्याचे नाव होईल म्हणून त्याने हा कॉल केल्याचे सांगितले.

आरोपी विक्रम सिंह याच्या कबुलीनंतर बीकेसी पोलिसांनी त्याच्याविरोधात भादंवि कलम ५०५ (१) (बी) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरातमध्ये रवाना झाले आहे.


हेही वाचा – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील ‘या’ वकिलाची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस