CoronaVirus : कोविड रुग्णालय, हेल्थ सेंटर व केअर सेंटरमध्ये ८२ टक्के खाटा भरलेल्या

रुग्णालयांमध्ये रुग्णांना खाटाच उपलब्ध होत नसल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या असतानाच प्रशासनाने व्यापलेल्या खाटा केवळ ८२ टक्केच भरलेल्या असल्याचा दावा केला आहे.

मुंबईत कोरोना कोविड – १९च्या उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना खाटाच उपलब्ध होत नसल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या असतानाच प्रशासनाने व्यापलेल्या खाटा केवळ ८२ टक्केच भरलेल्या असल्याचा दावा केला आहे. कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड केअर सेंटर दोन आदी ठिकाणी १३ हजार २३ खाटांची क्षमता असून त्यातील ८२ टक्के भरलेल्या आहेत. त्यामुळे १२ टक्के खाटा रिकामी असूनही बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यात का अडचणी येतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान मुंबईत सीलबंद इमारतींची संख्या १७००ने वाढली आहे.

मुंबईत मंगळवारपर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ७९१ एवढ्यावर पोहोचली असून मृतांचा आकडा हजार अर्थात १ हजार ६५ एवढा झाला आहे. मुंबईत २५ मेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर आणि पॉझिटिव्ह पण लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटर-२ आदींमध्ये एकूण १३ हजार २३ खाटांची क्षमता आहे. त्यातील ८२ टक्के खाटा व्यापलेल्या आहेत. कस्तुरबा, कुपर, सेव्हन हिल्स, राजावाडी आदींसह एनएससीआय, नेस्को, एमएमआरडीए आदींठिकाणी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सुरु केलेल्या कोविड रुग्णालयांमध्ये ही खाटांची उपलब्ध आहे. तर ओ ट्यूची क्षमता ४११६ खाटांच्या तुलनेत ६३ टक्के एवढी व्यापलेली आहे. तर ६४४ खाटांची आयसीयू आहे. त्यातील ९४ टक्के व्यापलेले आहे. याशिवाय ३५९ व्हेंटिलेंटर्सपैकी ६६ टक्के व्हेंटीलेटर्स वापरात आहेत. तर डायलिसिस करण्यासाठी ९२ खाटांची क्षमता आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

सीलबंद इमारती १७००ने वाढल्या

मुंबईत बाधित क्षेत्र अर्थात कंटेनमेंट झोनमध्ये सुधारणा करून झोन आणि सीलबंद इमारती यांची व्याख्या बदलून नव्याने रचना करण्यात आली होती. त्यानुसार मुंबईत २८०१ तुलने ६६१ कंटेनमेंट झोन आणि १११० इमारती सीलबंद जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र आठ दिवसांमध्ये बाधित क्षेत्रांची संख्या २५ने वाढून ६८६ एवढी झाली आहे. तर सीलबंद इमारतींची संख्या १७०० ने वाढून २८२६ एवढी झाली आहे

बाधित व्यक्तीच्या निकट संपर्कातील अर्थात अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना महापालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर १ मध्ये ठेवले जाते. पूर्ण दिवसांमध्ये अति जोखमीच्या संपर्कातील संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्याचे प्रमाण ८२९२ एवढे आहे. सध्या सीसीसी-वनमध्ये १६ हजार ६५१ संशयित रुग्णांना क्वारंटाईन केले आहेत. आतापर्यंत अशाप्रकारे क्वारंटाईन केलेल्या संशयित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ८६३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३८० तपासणी शिबिर घेण्यात आलेले आहेत. यामध्ये २२ हजार ५१५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यातील ५ हजार ५४२ लोकांचे नुमने घेण्यात आले होते. त्यातील ३४२ व्यक्तींचे नमुने चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले असल्याचे प्रशासनाने नमुद केले आहे.

केवळ १८ टक्केच नमुने पॉझिटिव्ह

मुंबईमध्ये २५ मेपर्यंत महापालिकेच्या कस्तुरबा, केईएमसह शासकीय ७ प्रयोगशाळा आणि १३ खासगी प्रयोग शाळांमध्ये एकूण १ लाख ७४ हजार ८४१ व्यक्तींच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. परंतु त्यातील १८ टक्केच व्यक्तींचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.