संपर्काशिवाय कोरोना स्वाब घेणं शक्य, जे जे रुग्णालयात स्मार्ट ओपीडी सुरु

जेजे रूग्णालयात आता रुग्णाच्या संपर्काशिवाय कोरोना स्वाब घेणं शक्य होणार आहे. कारण, जेजे रुग्णालयात आजपासून स्मार्ट ओपीडी सुरु करण्यात आली आहे.

JJ_Hospital
जे जे रुग्णालय

जेजे रूग्णालयात आता रुग्णाच्या संपर्काशिवाय कोरोना स्वाब घेणं शक्य होणार आहे. कारण, जेजे रुग्णालयात आजपासून स्मार्ट ओपीडी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णाच्या अधिकाधिक स्वाब घेता यावेत यासाठी जे. जे. रुग्णालयात स्मार्ट ओपीडी सुरु करण्यात आली आहे. यामुळे जेजे रुग्णालयात आता संशयित कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या संशयित कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्यात येत होते. त्यामुळे या रुग्णांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता आता संशयित कोरोनाबाधित रुग्नांचे स्वाब जेजे रुग्णालयातच घेता यावी यासाठी जे जे रुग्णालयात स्मार्ट ओपीडी सुरु करण्यात आली आहे. ही ओपीडी सेंट जॉर्ज रुग्णालय, जे. जे. रुग्णालय आणि मनीलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. या ओपीडीमध्ये प्लस ऑक्सिमीटर, डिजिटल स्टेथोस्कोप ठेवण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांचा स्वाब घेताना रुग्णाशी थेट संपर्क येणार नाही. त्यामुळे सध्या वापरण्यात येत असलेले पीपीई किटचीही बचत होण्यास मदत होणार आहे.

24*7 ओपीडी सुरु राहणार

गुरुवारपासून ही ओपीडी सुरु झाली असून या ओपीडीबाबतचे काम आधीच सुरु झाले होते. मार्डच्या डॉक्टरांनी या स्मार्ट ओपीडीसाठी बरेच प्रयत्न केले होते. जे जे रुग्णालयात दररोज ही ओपीडी २४ तास सुरु राहणार आहे. जवळपास ३ ते ४ डॉक्टर्स या ओपीडी साठी कार्यरत असतील अशी माहिती जे जे मार्डचे अध्यक्ष डॉ. अमेय सदार यांनी दिली आहे.

कशी आहे ही स्मार्ट ओपीडी?

रुग्णाच्या स्वाब चाचणीसाठी ही स्मार्ट ओपीडी सुरु करण्यात आली आहे. स्मार्ट ओपीडी म्हणजे एसी लावलेला एक डब्बा आहे ज्यामध्ये स्वाब घेणारी व्यक्ती असते. जी संपूर्ण पीपीई किट्स घालून आत बसलेली असते. कोणत्याही प्रकारच्या संपर्काशिवाय स्वाब घेतले जातात. ज्यामुळे डॉक्टर्स कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये एक शील्ड असते. एखादा रुग्ण रुग्णालयात चाचणीसाठी आला तर कोणत्याही संपर्काशिवाय त्यांचे स्वाब टेस्ट करता येतील. यामुळे , डॉक्टर्स, निवासी डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होईल.


हेही वाचा – मुंबईत दर तासाला एक करोना बळी