घरमुंबईमुंबईकरांनो ! असा होणार कोरोना लसीचा ड्राय रन

मुंबईकरांनो ! असा होणार कोरोना लसीचा ड्राय रन

Subscribe

मुंबईत २० दिवसात १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचण्यात लस टोचण्याचे लक्ष, कांजुरमार्ग, परेल येथील कोरोना वॅक्सीन कोल्ड स्टोरेज सज्ज

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी मुंबई पालिकेकडून जय्यत तयारी सुरू आहे. पालिकेने पाच टप्प्यांत लसीकरण करण्याचे ठरविले असून त्यातील पहिल्या टप्प्यात सव्वा लाख डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पालिकेच्या नियोजनानुसार लसीकरण मोहीम पाच टप्प्यांत पूर्ण होणार आहे. यासाठी मंगळवारी दादरमधील जी उत्तर वॉर्ड पालिका कार्यालयात १०० हून अधिक पालिका अधिकाऱ्यांसह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, १४ सहाय्यक आरोग्य चिकित्सा अधिकारी, आणि २४ चिकित्सा आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर घेत प्रत्येकावर विशिष्ट जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी मुंबई महापालिकेने १८ डिसेंबरपासून जी/उत्तर विभागातील धारावीपासून लसीकरण प्रशिक्षण सुरू केले असून पालिकेच्या विविध वॉर्डमध्ये असे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. महापालिकेने प्रशिक्षण कार्यक्रमातून ७६२ मास्टर ट्रेनर तयार केले असून त्यांनी आतापर्यत २५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. त्यांची ५०० पथके तयार केली जाणार असून त्यांच्याद्वारे लस देण्यात येणार आहे. त्याव्यतीरिक्त ५ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय आणखी ५ हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

- Advertisement -

रिपोर्टनुसार, भारताला १.७ अब्ज कोव्हिड प्रतिबंधक लसीची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या कोल्ड स्टोरेज क्षमता कुठे तरी कमी पडू शकते. भारतात सध्या ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस येण्याची शक्यता आहे. या लसीच्या साठवणुकीसाठी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवण्याची गरज आहे. भारतात, ही लस पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे.

आधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यात लसीचे वितरण सरकारने तरतुद केलेल्या नियमांनुसार होणार असून या लसीकरणाची व्याप्ती पाहता राज्यात याआधी विविध आजारांवरील लसीकरण मोहिमेपेक्षा कोरोना लसीकरण मोहिम अधिक जटील असणार आहे.केंद्र सकराकडून महाराष्ट्रासाठी दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचे डोस राज्य सरकारने निश्चित केलेल्या मुंबई सेंट्रल येथील मेडिकल डेपोमध्ये साठवले जाणार असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये लसीचे वितरण करण्यासाठी पुणे येथील आरोग्य भवनात पुन्हा पाठवले जाणार आहे. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांची एक टीम रस्ते वाहतुकीने मुंबई ते पुणे असा प्रवास करत मुंबईकरांसाठी लसीकरणाचे डोस घेऊन येणार आहे. यासाठी दहा वाहने तैनात करण्यात आली आहेत.

- Advertisement -

यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कांजुरमार्ग येथे विशेष कोल्ड स्टोअरेज तयार केले जात असून मुंबईकरांना पुरवण्यात येणाऱ्या लसीकरणाचा साठा ठेवला जाणार आहे. या कोल्ड स्टोअरेज तयार करण्याचे काम अद्यापही सुरु असून लसीकरणाच्या टप्प्यात अडथळा येऊ नये यासाठी पालिका विशेष काळजी घेत आहे. कांजूरमार्ग येथून या लसीकरणाचा साठा एफ दक्षिण पालिका कार्यालयातून मुंबई पालिकेच्या आठ रुग्णालयात पाठवला जाणार आहे. त्यानंतर लसीकरणाचा पहिला डोस मुंबईतील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. यात केईएम, सायन, कूपर, नायर, वांद्रे भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पीटल, राजावाडी हॉस्पीटल, वी.एन, देसाई हॉस्पीटल या आठ रुग्णालयांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सुरेश काकणी यांच्या अध्यक्षतेखाली कोव्हिड लसीकरण्यासाठी वितरण व देखरेखीसाठी दहा जणांचा समावेश असलेली टास्क फोर्स समिती तयार करण्यात आली आहे. कोरोनवरील लस देताना संबंधित व्यक्तीची कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यात पासपोर्ट, आधारकार्ड, वाहन परवाना आदी १२ प्रकारची ओळखपत्रे पैकी एक उपलब्ध असणे गरजेचे असेल. तसेच, कागदपत्रे तपासल्यावर त्या व्यक्तीला २-३ मिनिटातच लस देण्यात येईल.नंतर त्या व्यक्तीला लस घेतल्यावर काही ऍलर्जी झाली अथवा प्रकृतीमध्ये काही बिघाड झाल्यास त्याला एका विशेष कक्षात ठेवण्यात येईल व तेथे त्यावर तज्ञ डॉक्टर हे देखरेख ठेवतील आणि पुढील उपचार देतील, असे काकाणी यांनी सांगितले.

पालिकेने गठीत केलेल्या या दहा टास्ट फोर्समध्ये सहभागी असलेल्या पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहा टास्क फोर्समध्ये आणखी तीन टीम तयार करण्यात आल्या असून पहिली टीम पालिका रुग्णालयातील लसीकरण अभियनावर लक्ष ठेवणार असून दुसरी टीम वार्डनिहाय लसीकरण अभियानावर कार्यावर लक्ष ठेवणार आहे. तर, तिसरी टीम लसीकरणासाठी लागणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानंतर पहिला टप्प्यात देण्यात येणारे लसीकरण तीन टप्प्यात विभागण्यात आले आहे. यासाठी एक वर्षाच्या कालावधी लागणार आहे. या पहिल्या टप्प्यात सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सैनिक, सरकारी अधिकारी व कर्मचारी तर तिसऱ्या टप्प्यात ५० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. यामध्येही अधिक जोखमीच्या रुग्णांना प्राथमिकता देत लस दिली जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.

आठ निश्चित करण्यात आलेल्या पालिका रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची टीम गठीत करण्यात आली. या टीममधील चार सदस्यांमध्ये एक हेड नर्स आणि चार सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तसेच लस देण्याकरिता निश्चित केलेल्या क्षेत्रात प्रवेश नियंत्रित करण्यासाठी एक गार्ड देखील असणार आहे.

राज्य सरकारकडून पालिकेला लसीकरण साठवणूकीसाठी १७ रेफ्रिजेरेटर्स देण्यात आले असून ते आठ रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहे. या प्रत्येत कोल्ड फ्रिजमध्ये ४८,००० हजार लसीकरणाऱ्या बॉटल्स साठवू शकतो. तर पालिकेने 40-क्यूबिक मीटर व 49-क्यूबिक मीटर वॉक कोल्ड फ्रिज देण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी केली आहे. या फ्रिजमध्ये ६० लाख लसीकरण डोसच्या बॉटल्स ठेवण्याची सक्षमा असणार आहे. त्याचप्रमाणे ३०० कोल्ड बॉक्सचीही मागणी केली आहे. या प्रत्येक बॉक्समध्ये १२,००० बॉटल्स ठेवण्याची सक्षमा असणार आहे. तसेच प्रत्यक्षात कोरोना प्रतिबंधक लसीकरण देण्यात येणाच्या ठिकाणी तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्पा लस टोचणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिक्षालय दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीला प्रत्यक्ष लस टोचण्यात येणार तर तिसऱ्या टप्प्यात लस टोचण्यात येणाऱ्या व्यक्तीला अर्धा तास डॉक्टरांच्या निरीक्षणा खाली ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये व्यक्तीला लस टोचल्यानंतर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी लसीकरण (एईएफआय) व्यवस्थापन केंद्रे असणार आहे. त्यामध्ये एक कार्डियोलॉजिस्ट, एक वैद्यकीय अधिकारी आणि एक न्यूरोलॉजिस्ट यांचा समावेश असणार आहे.

उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ शीला जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रति दिवशी १५००- २००० नागरिकांना लस टोचण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून आठ रुग्णालयांमध्ये पाच अधिकाऱ्यांची टीम दोन शिफ्टमध्ये काम करणार आहे. लसीकरणाऱ्या पहिल्या टप्प्यातील २० दिवसांच्या कालावधीत १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.


हेही पाहा – लसीकरणासाठी ७६२ मास्टर ट्रेनर ; २५०० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -