४८ दिवसांत ८५ हजार कोरोना केसपैकी १५,५०० लोकांनाच लक्षणे

corona
corona

सध्या  मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या ४८ दिवसांत ८५ हजार कोरोना केस आढळून आल्या असून त्यांपैकी फक्त १५,५०० लोकांमध्येच कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांपैकीही ८००० लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. पालिका आयुक्तांनी आज बीकेसी  जंबो कोविड सेंटरमध्ये जाऊन कोरोनावरील प्रतिबंधक लसीचा डोस घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.

केंद्राच्या परवानगीनंतर घरोघरी लसीकरण

कोरोनाला रोखण्यासाठी घरोघरी जाऊन कोरोनावरील लस देण्याची योजना राबविण्याचा मनोदय पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने घरोघरी लसिकरणाची परवानगी देताच मुंबईत मोठ्या संख्येनं लसिकरण सुरु होऊ शकेल, असे आयुक्त यांनी म्हटले आहे. १० फेब्रुवारीला कोविडची दुसरी लाट सुरु झाली आहे. कालपर्यंत १० लाखांहून अधिक लोकांचे लसिकरण झाले आहे. दर दिवसाला ४० ते ४५ हजार लोकांचे लसिकरण होते. दरदिवसाला १ लाख लोकांच्या लसिकरणाचे लक्ष्य महापालिकेनं समोर ठेवले आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये लसिकरण अत्यल्प प्रमाणात होत आहे. तेथील लसिकरण वाढवण्याची गरज आहे. खाजगी रुग्णालयात दररोज १ हजार  लोकांचं लसिकरण होणं गरजेचं आहे, असे आयुक्त यांनी म्हटले आहे.

वार्ड वॉर रूमच्या परवानगीनेच कोरोना रुग्णांना बेडची उपलब्धता

मुंबईत कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेचे वॉर्ड वॉर रुम पुन्हा सक्रीय करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. सरकारी, पालिका अथवा खाजगी रुग्णालयं, नर्सिंग होम या ठिकाणी लक्षणे नसलेल्या आणि कोणतेही दीर्घकालिन आजार नसलेल्या कोरोना रुग्णांना सरसकट बेड देऊ नयेत, असे आदेश आयुक्त चहल यांनी संबंधित यंत्रणेला दिले  आहेत. त्यामुळे आता वॉर्ड वॉर रुमला कळवल्याशिवाय कोरोना रुग्णांना थेट बेड देता येणार नाहीत. तसेच वॉर्ड वॉर रुममधून रुग्णखाटांची उपलब्धता करुन देण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जावी, असे आयुक्त यांनी म्हटले आहे.

मोठ्या संख्येने बेड उपलब्ध होणार

डॅशबोर्डवर १३ हजार बेड आहेत. येत्या आठवड्यात २० हजार बेड उपलब्ध होतील. खाजगी रुग्णालयांमधील ८०% बेड आणि १००% आयसीयु बेड हे पालिका ताब्यात घेत आहे.सध्या ३००० बेड रिकामे आहेत. खासगी रुग्णालयामध्ये ४५० बेड रिकामे आहेत. तसेच, बंद केलेले जम्बो कोविड सेंटर पालिका पुन्हा सुरु करणार आहे.जंबो कोविड सेंटरमध्ये तब्बल ९ हजार बेड उपलब्ध होणार आहेत.

दररोजची रुग्णसंख्या १० हजारांवर जाणार

पुढच्या काही दिवसांत दरदिवसाची रुग्णसंख्या १० हजारांवर जाईल. पुढच्या आठवड्यात ६० हजार टेस्ट होतील आणि कोविड रुग्णांची संख्या दरदिवसाला १० हजारांपर्यंतही पोहोचेल. मात्र दरदिवशी १० हजार रुग्ण सापडले तरी बेड तेवढ्याच संखेनं लागणार नाहीत.ज्यांना रुग्णालयात नेण्याची गरज पडेल त्यांच्यासाठी बेड पुरेसे असतील. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेड व्यवस्थापनाची साखळी पुन्हा एकदा सक्रीय करणार, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

बेड अॅलॉटमेंट सिस्टीम

उच्चभ्रु लोक वशिल्याचा वापर करुन परस्पर लॅबकडून कोविड रिपोर्ट घेतात आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवतात. मात्र, बेड व्यवस्थापन साखळी तुटते. वॉर्ड वॉर रुमकडून रुग्णाची दररोज चौकशी केली जाते आणि लक्षणे असल्यास तसेच कोमॉर्बिड व्यक्तीना सरकारी किंवा खाजगी रुग्णालय अशा त्यांच्या मागणीनुसार बेड  उपलब्ध करुन दिला जातो. जम्बो कोविड सेंटर, खाजगी रुग्णालयातील ८०% बेड पुन्हा सक्रीय करण्यात येणार आहेत  टप्प्याटप्प्यानं आठवड्याला बेडची संख्या वाढवत नेणार असल्याचे आयुक्त यांनी म्हटले आहे. नाईट कर्फ्युसारखे निर्बंध सध्या लावले आहेत.१५ दिवसांच्या काळात नाईट कर्फ्युचा परिणाम होतोय का हे बघितलं जाईल आणि पुढचा निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.