घरमुंबईमहानगरपालिका-पीडब्लूडीच्या वादात नवी मुंबईतील रस्ता खड्ड्यात

महानगरपालिका-पीडब्लूडीच्या वादात नवी मुंबईतील रस्ता खड्ड्यात

Subscribe

रस्ता जरी नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असला तरी त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. दोघांच्या वादात हा रस्ता अडकल्याने त्याचा फटका या मार्गावरून जाणार्‍या अनेक प्रवाशांना पडत आहे.

अनेकांचे जीव घेणार्‍या मुंबई-पुणे रस्त्यावर यंदाही खड्डे पडल्याने या वर्षी हे खड्डे किती जणांचा जीव घेणार हे सुरु असलेला पावसाळाच ठरवणार आहे. पावसाळा सुरु होऊन काही दिवस उलटत नाही तोच या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात झाल्याने या मार्गावरून जाणार्‍या अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. हा रस्ता जरी नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असला तरी त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. दोघांच्या वादात हा रस्ता अडकल्याने त्याचा फटका या मार्गावरून जाणार्‍या अनेक प्रवाशांना पडत आहे.

पावसाने या मार्गाचे उघडे पडले पितळ 

बेलापूर ते वाशी हा १४ किलोमीटरचा रस्त्याचा भाग नवी मुंबई पालिका हद्दीत येतो.ज्या वेळी या ठिकाणी एखादी दुर्घटना घडते अथवा वाहतूक ठप्प होते त्यावेळी नवी मुंबई शहराचे नाव चव्हाट्यावर येते. गेल्या शनिवार ते सोमवार दरम्यान शहरात पडलेल्या मुसळधार पावसाने या मार्गाचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने गत सोमवारी वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी शासनाने २५ किमी लांबीच्या मुंबई-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. त्यासाठी १२०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. ६ जानेवारी २०१५ पासून खारघरमध्ये टोलवसुली सुरू करण्यात आली. परंतु लहान वाहनांना टोलमधून सूट दिल्याने नुकसान होत असल्याने ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली.

- Advertisement -

शासनाच्या व कंपनीच्या वादात प्रवाशांचे हाल

शासनाच्या व कंपनीच्या वादात प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान पालिकेने महामार्गालगतच्या जागेचे सुशोभीकरण केल्याने नवी मुंबई शहरातून जाणारा बेलापूर ते वाशीदरम्यानचा मुंबई-पनवेल महामार्गाचा भाग पालिकेकडे हस्तांतरित करून घेण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. देखभाल-दुरुस्तीबाबत पालिकेला वारंवार शासनाकडे पाठपुरावा करावा लागत आहे. हा मार्ग हस्तांतरित झाल्यास वाशी ते बेलापूरदरम्यान रस्त्याची साफसफाई करणे शक्य होणार आहे. त्यामुळे धूलिकणांमुळे होणारे प्रदूषण थांबणार आहे. खड्डे बुजवणे, दिवाबत्ती ही कामे वेळीच होणे शक्य आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुशोभीकरण करणे शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -