कल्याण-डोंबिवली कोरोनाच्या विळख्यात; १५ दिवसात १२७४ रूग्ण, ३१ रूग्णांचा मृत्यू

आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा हा २३०७ वर पोहचला आहे.

कल्याण- डोंबिवली शहराला कोरोनाचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसात केडीएमसी क्षेत्रात तब्बल १२७४ रूग्ण वाढले असून ३१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पावसाच्या तोंडावर कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंता व्यक्त करणारी आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांनी केडीएमसी क्षेत्रात सोमवारी १३१ नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत, तर २४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा हा २३०७ वर पोहचला आहे. गेल्या चार दिवसांपासून रूग्णांचा सरासरी आकडा हा शंभरवर पोहचला आहे.

१ जूनपासून ते १५ जूनपर्यंत कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येतय. मार्च महिन्यात करोनाचा रूग्ण आढळून आला होता, त्यानंतर एक हजार रूग्णांचा आकडा गाठायला तब्बल देान महिने लागले. पण जून महिना उजाडल्यानंतर दोन महिन्यानंतरचा एक हजाराचा आकडा अवघ्या पंधरा दिवसातच डब्बल झाला आहे. कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने  चिंता आधिकच वाढली आहे. आतापर्यंत १०३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून ११८५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र यामध्ये अवघ्या पंधरा दिवसात मृत्यू झालेल्यांची संख्या ३१ आहे.  त्यामुळे रूग्ण संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येतय.

अनॅलॉक- १ अंतर्गत सरकारी व खासगी कार्यालये व कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात, कामाच्या ठिकाणी तसेच एसटी स्टॅन्डवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळेच रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भीती असते त्यामुळे पावसाळयातही करोनाचे संकट वाढण्याची भिती गडद झाली आहे.