Ind vs Aus पहिली वनडे : भारताची दाणादाण, ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाणा पराभव!

ind vs aus aron finch david warner partnership

श्रीलंकेविरूद्धच्या टी-२० मालिकेमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास ‘साँतवे आसमाँ’पर होता. याच आत्मविश्वासात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मुंबईच्या वानखेडे मैदानावर उतरली खरी, पण दिवसाचा शेवट निराशाजनकच नाही तर नामुष्कीने होणार आहे, याची कदाचित पुसटशीही कल्पना टीम इंडियाला बहुतेक नसेल. पहिली फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाच्या धुरंधरांना ऑस्ट्रेलियानं तिखट मारा करत अवघ्या २५६ धावांवरच सर्वबाद केल्यामुळे भारतीय संघाचा वारू गोंधळला होता. पण ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर एरॉन फिंच आणि डेविड वॉर्नर या दोघांनीच हे आव्हान तब्बल ७० चेंडू राखून पार केलं आणि टीम इंडियाचा तो वारू अक्षरश: चारीमुंड्या चित झाला!

आधी फलंदाजांनी गमावला सामना!

वानखेडेवर उतरलेल्या कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल गमावला, तेव्हाच क्रिकेट चाहत्यांच्या मनात खुट्ट झालं! ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं. आश्वासक सुरुवात करणाऱ्या भारतीय फलंदाजांनी नंतर मात्र हाराकिरी केली. यामध्ये शिखर धवन (७४) आणि लोकेश राहुल (४७) यांच्या धावांच्या जोरावर भारतानं २५५ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्मा उण्यापुऱ्या १० धावा करून माघारी परतल्यामुळे पुढच्या फलंदाजांवर वाढलेलं दडपण शेवटपर्यंत कमी झालंच नाही. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेला मारा भारतीय फलंदाजांसाठी सर्वात महत्त्वाचा अडसर ठरला. मिचेल स्टार्क (३ बळी), पॅट कमिन्स-रिचर्डसन (प्रत्येकी २ बळी) आणि झॅम्पा-आगर (प्रत्येक १ बळी) या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीची भरभक्कम फळी अक्षरश: कापून काढली.

पिक्चर अभी बाकी थी मेरे दोस्त…!

खरंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करणाऱ्या भारतीय फलंदाजांना आपल्या गोलंदाजांकडून समर्थ कामगिरीची आशा होती. मात्र, फलंदाजांच्या परीक्षेनंतर आता भारतीय गोलंदाजांची देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अक्षरश: परीक्षा पाहिली. खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचे फक्त सलामीवीर. कारण या दोघांनी पुढच्या फलंदाजांना मैदानावर येण्याची वेळच येऊ दिली नाही. या दोघांनीच भारतीय गोलंदाजी झोडपून काढत पहिल्या विकेटसाठी नाबाद २५६ धावांची भागीदारी केली आणि सामना अगदी सहज ऑस्ट्रेलियाच्या झोळीत आणून सोडला. बरं भारताच्या सर्वच्या सर्व म्हणजे १० फलंदाजांनी जवळपास ५० षटकांमध्ये केलेल्या धावा या दोघांनीच तब्बल ७८ चेंडू शिल्लक राखून पार केलं. डेविड वॉर्नर (नाबाद १२८) आणि एरॉन फिंच (नाबाद ११०) या दोघांनी भारतीय गोलंदाजीची पिसं काढत मैदानात चौफेर फटकेबाजी केली.