IND vs WI Highlights : प्रसिद्ध कृष्णाची मालिकेतील कामगिरी सर्वोत्कृष्ट, रोहित शर्माकडून कौतुकाची थाप

संपूर्ण संघ 46 षटकांत 193 धावांत गारद झाला. प्रसिद्ध कृष्णाशिवाय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरनेही 2 बळी घेतले. 9 षटकात 12 धावा देत 4 बळी घेणारा कृष्णा सामनावीर ठरला.

IND vs WI Highlights rohit sharma appreciate prasidh krishna bowling skill
IND vs WI Highlights : प्रसिद्ध कृष्णाची मालिकेतील कामगिरी सर्वोत्कृष्ट, रोहित शर्माकडून कौतुकाची थाप

भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेवर विजय मिळवला आहे. संघाने दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीजला ४४ धावांनी पराभूत करुन तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने पहिली फलंदाजी करत ९ बाद २३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ १९३ धावांवर तंबूत परतला. रोहित शर्माला एकदिवसीय मालिका कर्णधार केल्यानंतर हा पहिलाच विजय आहे. सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने १२ धावा देत ४ गडी बाद केले आहेत. सहावा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला चांगली सुरुवात करता आली नाही. रोहित शर्माने 5, ऋषभ पंतने 18 आणि विराट कोहलीनेही 18 धावा केल्या. संघाने 43 धावांत 3 मोठे विकेट गमावले होते. ओडियन स्मिथने 2 विकेट घेतल्या.

सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करत संघाचा ताबा घेतला. केएल राहुलने 48 चेंडूत 49 तर सूर्यकुमारने 83 चेंडूत 64 धावा केल्या. मात्र, मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या राहुलला अर्धशतक पूर्ण करता आले नाही आणि तो धावबाद झाला.

वॉशिंग्टन सुंदरने 24 आणि दीपक हुडाने 29 धावा करत धावसंख्या 200 च्या पुढे नेली. संघाने 9 बाद 237 धावा केल्या. स्मिथशिवाय अल्झारी जोसेफनेही वेस्ट इंडिजकडून २ बळी घेतले. जोसेफने 10 षटकात केवळ 36 धावा दिल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघाने 10 षटकांतच त्यांचे 2 मोठे विकेट गमावले होते. ब्रेडन किंगने 18 आणि डॅरेन ब्राव्होने एक धाव केली. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने दोघांची विकेट घेतली.

संघाने आणखी झटपट 3 विकेट गमावल्या. धावसंख्या 5 गडी बाद 76 अशी झाली. यानंतर शामर ब्रूक्सने 44 धावा करत संघाचा डाव सांभाळला. याशिवाय अकील हुसेननेही ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. संघाची धावसंख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा होती.

ओडिअन स्मिथने अखेर 20 चेंडूत 24 धावा करत धावसंख्या 190 च्या पुढे नेली. संपूर्ण संघ 46 षटकांत 193 धावांत गारद झाला. प्रसिद्ध कृष्णाशिवाय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरनेही 2 बळी घेतले. 9 षटकात 12 धावा देत 4 बळी घेणारा कृष्णा सामनावीर ठरला.


हेही वाचा : Ind Vs WI : रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजविरूद्ध पहिला मालिका विजय