Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई स्वातंत्र्यलढ्यातील नेत्या अरुणा असफ अली

स्वातंत्र्यलढ्यातील नेत्या अरुणा असफ अली

Related Story

- Advertisement -

अरुणा असफ अली या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी नेत्या, छोडो भारत आंदोलनातील वीरांगना आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी. अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचे पूर्वीचे नाव. त्यांचा जन्म १६ जुलै १९०९ रोजी पंजाबमधील कालका शहरात एका श्रीमंत बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. पुढे हे कुटुंब कलकत्ता शहरात स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, तर माध्यमिक शिक्षण नैनिताल येथील प्रॉटेस्टंट विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचे काम केले. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने 23 वर्षे मोठे असलेल्या सुप्रसिद्ध मुस्लिम वकील असफ अली यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला (1928). या विवाहास त्यांच्या कुटुंबियाचा विरोध होता. विवाहानंतर अरुणा यांनी आपल्या पतीबरोबर युरोप, अमेरिका, सोव्हिएत युनियन, मेक्सिको या देशांचा दौरा केला.

युनेस्कोसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. असफ अली हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे अरुणा यांचा संबंध भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी आला. त्या स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्या. महात्मा गांधी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता व त्यांच्याबरोबर त्या सभा, प्रभातफेर्‍या यांमध्ये सहभागी झाल्या. 1930 व 1932 च्या कायदेभंग चळवळीत तसेच 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्या सहभागी झाल्या, त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1930 पासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी खादीचे कपडे वापरले. म. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहावेळी मीठ बनविणे, मिरवणुका काढणे आणि सभा भरविणे हे काम त्यांनी सर्वत्र फिरून केले. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरला व त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली. गांधी-आयर्विन करारानुसार बहुसंख्य राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात आली, पण अरुणा यांना मुक्त करण्यात आले नाही. जनतेच्या प्रखर आंदोलनामुळे काही दिवसांनी त्यांची सुटका झाली. 1932 मध्ये त्यांना पुन्हा अटक करून तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आणि दोन हजार रुपयांचा दंडही केला. तुरुंगातही सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

- Advertisement -

छोडो भारत आंदोलनामुळे त्यांच्या आयुष्यास वेगळे वळण मिळाले. 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अधिवेशन मुंबईला गवालिया टँक मैदानावर आयोजित केले होते. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात टाकल्याने देशात राजकीय पोकळी निर्माण झाली होती. गवालिया टँक मैदानावर पोलिसांचा पहारा होता. अशा वेळी पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणा यांनी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकाविला. ऑगस्ट क्रांतिदिनाच्या त्या वीरांगना ठरल्या. चळवळीला मदत करण्याच्या उद्देशाने चार वर्षे 1946 पर्यंत त्या भूमिगत कार्यरत राहिल्या. अरुणा दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या (1958). या काळात त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी प्रयत्न केले. भारत सरकारने 1992 मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’, तसेच सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार मरणोत्तर देऊन त्यांचा गौरव केला (1997).दिल्ली येथे त्यांचे 29 जुलै 199६ रोजी निधन झाले.

- Advertisement -