घरCORONA UPDATEउल्हासनगरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोग्य कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण 

उल्हासनगरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोग्य कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण 

Subscribe

पोलिसांकडून डॉक्टरला मारहाण झाल्याची पहिलीच घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णलायत सोमवारी घडली.

रुग्णांच्या नातेवाईकांकडून सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, आणि कर्मचारी यांना मारहाण करण्यात आल्याचा घटना ऐकल्या असती, मात्र पोलिसांकडून डॉक्टरला मारहाण झाल्याची पहिलीच घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णलायत सोमवारी घडली. या घटनेचा मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी निषेध करून मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील डॉक्टर व कर्मचारी यांनी दिला आहे.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी केंद्र शासनाने परवानगी दिलेली आहे, मात्र त्यांना मूळ गावी जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात कळवा आणि उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात दोनच सरकारी रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची सुविधा असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश मजूर आणि अडकलेल्या लोकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलाय आणि उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दररोज हजारोच्या संख्येने गर्दी करीत आहे.

- Advertisement -

४ मे रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर ३ या ठिकाणी असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती. वैद्यकीय प्रमाणपत्रवर मारण्यात येणाऱ्या वैदयकीय अधिकारी यांचा आणखी एक रबरी शिक्के तयार करण्यासाठी येथील सामाजिक अधीक्षक सतीश वाघ हे शिक्के बनवणाऱ्या दुकानात गेले होते. सरकारी काम असल्यामुळे शिक्के बनवणाऱ्या दुकानदाराने लागलीच कोविड-१९ चे रबर शिक्के बनवून दिले. ते शिक्के घेऊन डॉ. सतीश वाघ रुग्णालयात आले, व त्यांनी आपली मोटारसायकल गेटवर उभी करून शिक्के बरोबर आहे की नाही हे दाखवण्याकरता डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्याकडे जात असताना गेट जवळ साध्यावेशात असणारे पोलीस अधिकारी खातीब आणि इतर पोलीस शिपायांनी डॉ. वाघ यांना थांबवले आणि गेटवरून मोटारसायकल बाहेर काढण्यास सांगितले. डॉ. वाघ यांनी आपली ओळख सांगून ओळखपत्र पोलीस अधिकारी खातीब यांना दाखवले, आणि मी शिक्के दाखवून लगेच येतो आणि मोटारसायकल काढतो असे सांगूनही पोलीस अधिकारी खातीब हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी डॉ.वाघ यांनी त्यांना शिवीगाळ करू नका, असे म्हटल्यावर पोलीस अधिकारी खातीब आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी डॉ.वाघ यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरुवात केली. खातीब यांनी सामाजिक अधीक्षक वाघ यांची शर्टाची कॉलर पकडून त्यांना फरफटत  पोलीस ठाण्यात आणण्यात आले असे स्वतः डॉ. वाघ यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

झालेल्या प्रकारची माहिती मिळताच मध्यवर्ती रुग्णालयातील जिल्ह्या शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन सामाजिक अधीक्षक सतीश वाघ यांना पोलिसांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसाच्या मारहाणीत जखमी झालेले सामाजिक अधीक्षक सतीश वाघ यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सामाजिक अधीक्षक सतीश वाघ यांना पोलिसाकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर, नर्स इतर कर्मचारी यांनी निषेध केला असून डॉ. वाघ यांना मारहाण करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणून अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मध्यवर्ती रुग्णालयात काम बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. सुधाकर शिंदे यांनी मद्यवर्ती पोलिस ठाणे, पोलीस उपायुक्त, आणि ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही, तसेच वरिष्ठ अधिकारी यांचा देखील संपर्क झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -