Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई नवोन्मेषी कवी वा. रा. कांत

नवोन्मेषी कवी वा. रा. कांत

Related Story

- Advertisement -

कविवर्य वा. रा. कांत यांचा आज स्मृतिदिन. वामन रामराव कांत हे मराठी कवी, गीतकार होते. त्यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत या नावाने ते लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. वा. रा. कांतांचे वडील रामराव कांत हे निजाम दरबारी पोलीस अंमलदार होते. घरामध्ये कर्मठ शिस्त. कवी कांतांच्या मातोश्री जानकीबाई या हरिपाठ, पूजाअर्चा, भजन-कीर्तन इत्यादीत रममाण असायच्या. आईच्या या संस्कारांमुळेच कांतांमध्ये कवितालेखनाचे बीज आले असावे. पण वडिलांच्या शिस्तप्रिय, कडक स्वभावामुळे आणि त्याकाळी भोगलेल्या निजामाच्या अन् इंग्रजांच्या पारतंत्र्यामुळे कांतांच्या स्वातंत्र्यपूर्व काव्यप्रतिभेत स्थंडीलसंप्रदायी गुण दिसून येतात.

वा. रा. कांतांनी विपुल कवितालेखन केले. स्वत:च्याच कवितेवर प्रयोग करीत असताना आपल्या सहा दशकांच्या साहित्यसेवेत कांतांनी नाट्यकाव्य-द्विदलार्थी कविता ‘दोनूली’ हा नवा काव्यप्रकार मराठी साहित्यात आणला. या सहा दशकांच्या काव्यप्रवासात कांतांच्या कवितेने आपली अनेक रूपे मराठी रसिकांसमोर सादर केली. कांतांचे स्वत:च्याच कवितेशी एक अतूट नाते होते. सर्जनशील, चैतन्यशील, संवेदनशील व नित्य नवा उन्मेष प्रकट करणारी कविवर्य वा. रा. कांतांची कविता त्यांच्या वयाच्या अखेरी अखेरीस मृत्यूशी संवाद करू लागली होती. या काळात कांतांची जीवनदृष्टीच अगदी निराळी होऊन गेली होती. मृत्यूविषयी प्रत्येकाच्या मनात खोलवर भीती दडलेली असते.

- Advertisement -

आपल्याला माहीत आहे की, मृत्यू अंतिम अन् अटळ आहे. परंतु कांतांच्या कवितेत याच मृत्यूविषयीचा अनुभव गूढ व गहिरा होतो व वाचकांना अचंबित करून टाकतो. कांतांच्या काव्यप्रतिभेचं हे एक अनोखं वैशिष्ठ्य आहे की त्यांच्या कवितेत देशभक्ती, क्रांती, प्रेम, विरह, निसर्ग, सौंदर्य या अनुभूतींबरोबरच अखेरच्या काळातील कवितांमधून मृत्यूविषयीचे चिंतन अधिक प्रगल्भ आणि गहिरे जाणवते. त्यांच्या जीवनातील अखेर अखेरच्या कवितेतून उतरलेल्या मृत्यूविषयीच्या उल्लेखाने एक प्रकारचा अचंबित व स्तंभित करणारा भाव स्पर्शून जातो. कांतांचे हे मृत्यूविषयक आत्मचिंतन त्यांच्या अखेरच्या कवितासंग्रहात ‘मावळते शब्द’मध्ये अनेक कवितांमधून उलगडत जाते.

कवितेतील मृत्यूविषयीच्या चिंतनात कांतांना कधी मरण म्हणजे एक प्रेरणा देणारी शक्ती आहे असेही वाटते. त्यांच्या चिंतनाचा प्रगल्भ आणि गूढखोल विस्तार म्हणजे कांतांचे ‘मरणगंध’ नावाचे महाभारतातील व्यक्तिचित्रणावरील नाट्यकाव्य. पंडूच्या मृत्यूप्रसंगीच्या कथाभागात मरणगंधाची खरी ‘गंधवार्ता’ सांगताना ते लिहितात-

- Advertisement -

‘मरण टळत नाही
ते टळलं असतं तर
तर मग सारं माधुर्यच नष्ट झालं असतं
जीवनातलं, स्वप्नातलं’

पंडूच्या मृत्यूप्रसंगी असं म्हणताना कांत मृत्यूलाही एक उदात्त अर्थ देऊन जातात. ‘सौंदर्यापुढं गळून जातं, जळून जातं मरणाचं भय’ आणि ‘मरणाच्या सौंदर्यातूनच जीवनानंद प्राप्त होतो’ असे कांत म्हणतात. अशा या महान कविवर्याचे 8 सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.

- Advertisement -