घरCORONA UPDATEजेवणा ऐवजी आता महापालिका वाटणार धान्याची पाकिटे; तांदुळ, गहु व डाळीचे वाटप

जेवणा ऐवजी आता महापालिका वाटणार धान्याची पाकिटे; तांदुळ, गहु व डाळीचे वाटप

Subscribe

५ किलो तांदुळ, ३ किलो गहू आणि २ किलो डाळ अशाप्रकारे दहा किलो जीवनाश्यक वस्तूंच्या पाकिटांचा पुरवठा केला जाणार आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेच्यावतीने बेघर, गरजू व विस्थापित कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरदिवशी दुपार तसेच संध्याकाळी सुमारे सात लाख जेवणाची पाकिटे पुरवली जात असून या जेवणाची पाकिटे पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता आता प्रशासनाने या कुटुंबांना धान्याची अर्थात शिधा पाकिटांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ किलो तांदुळ, ३ किलो गहू आणि २ किलो डाळ अशाप्रकारे दहा किलो जीवनाश्यक वस्तूंच्या पाकिटांचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये महापालिकेच्या निधीची बचत होत असून खराब जेवणाच्या येणाऱ्या तक्रारींचेही प्रमाण कमी होईल, असे महापालिकेचा विश्वास आहे.

राज्य शासनाच्या राज्य आपत्कालिन मदत निधीतून महापालिकेला मुंबईतील गरीब, गरजू, तसेच अडकलेल्या कामगार, मजरांसाठी जेवण वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु हा निधी फक्त शिजवलेल्या अन्न वाटपासाठी असून धान्य खरेदी करता नाही, असे शासनाने सांगितले आहे. परंतु आता अडकलेला बहुतांशी कामगार, मजूर हे गावी परतू लागले असून मुंबईतील गोरगरीब व गरजू कुटुंबांना जेवणाच्या पाकिटांऐवजी धान्याची पाकिटांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत प्रत्येक दिवशी सकाळ व संध्याकाळ या योजनेचा लाभ साडेतीन लाख लोकांनी घेतला आहे. त्यामुळे या योजनेवर प्रत्येक दिवशी २.५२ कोटींचा खर्च होत आहे. आणि अप्रत्यक्ष हा खर्च वाढतच जात आहे. त्यातच आता रमजानच्या काळात या अन्न पाकिटांचे वाटप करावे लागत असल्याने यासर्व कर्मचाऱ्यांना वसाहतींमध्ये कमीत कमी ३ वेळा जावे लागते आणि साडेतीन लाख लाभार्थी व महापालिकेच्या सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी संपर्क वाढत जात आहे.

- Advertisement -

त्यामुळेच आता महापालिकेच्या निधीतून धान्य पाकिटांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी तांदुळ व गहू हे एफसीआयकडून व डाळ ही फुड अँड सिव्हिल सप्लाय यांच्याकडून खरेदी केली जाणार आहे. बाजार विभागाच्या सहायक आयुक्त यांच्या मार्फत धान्याची खरेदी केली जाणार आहे. हे धान्य खरेदी करून पॅकिंग करणाऱ्या संस्थांच्या भांडारात त्यांच्या क्षमतेप्रमाणे पाठवले जाणार आह. त्यानंतर पॅकींग केलेली धान्याची पाकिटे आवश्यकतेनुसार नगरसेवक तथा त्यांच्या प्रतिनिधींसोबत वाटप केले जाणार आहे.

धान्यवाटप करताना लाभार्थीच्या हातावर शाई

या धान्य पाकिटांच्या वाटपासाठी ऍप बनवण्यात आले असून ज्या व्यक्तीला या पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे, त्यांचे नाव, फोन नंबर, आधार कार्ड नंबर भरून घेतला जाईल आणि मगच धान्याचे पाकिटे दिले जाईल. शिवाय प्रत्येक लाभार्थ्याच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाईने चिन्हांकीत केले जाणार आहे. यामुळे धान्य वाटपात कोणताही गैरव्यवहार होणार नाही तसेच कुणीही पुन्हा पुन्हा त्याचा लाभ घेणार नाही. मात्र, धान्य वाटप केल्यानंतर जेवणाची पाकिटे बंद केली जाईल. परंतु ज्याठिकाणी नगरसेवकांची मागणी असेल तिथेच फक्त जेवणाची पाकिटे वितरीत केली जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

जेवणाच्या पाकिटांवरील खर्च ७३ कोटींच्या घरात

आजपर्यंत प्रत्येक दिवशी दोन्ही वेळच्या जेवणाची सुमारे ७ लाख अन्नाची पाकिटे वितरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे त्यावरील खर्च ७३ कोटी ५० लाख रुपये एवढा अपेक्षित मानला जात आहे. परंतु धान्य वाटपाचा अंदाजित खर्च हा १६ कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे. त्यामुळे धान्य वाटपाची सुविधा त्वरीत सुरु केल्यास एकूण खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल. तसेच मनुष्यबळामध्ये कपात करणे शक्य होईल व त्या मनुष्यबळाचा वापर अन्य महत्वाच्या कामांकरता करता येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जेवणाची दोन्ही वेळची पाकिटांची संख्या: सुमारे ७ लाख

जेवणाच्या एका पाकिटाची किंमत : ३५ रुपये

पुरवण्यात येणाऱ्या धान्यपाकिटांची संख्या : ३ लाख ७५ हजार

धान्याच्या पाकिटांचा एकूण खर्च : ३५५ रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -