राणी बागेतील पेंग्विन कक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालय

हे मत्सालय येत्या एका वर्षात उभारण्यात येणार असून त्यासाठी पालिका ४४ कोटी रुपये खर्च करणार आहे

international standard aquarium in Penguin Room in the rani baug byculla mumbai

भायखळा येथील राणीची बाग व प्राणी संग्रहालय आधुनिकतेची कास धरत कात टाकत आहे. राणीची बाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘झू पार्क’ होणार आहे. या राणीच्या बागेत पेंग्विन, इतर प्राणी व पक्षी यांची सफर करायला येणाऱ्या पर्यटकांना लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालय पेंग्विन कक्षात बघायला मिळणार आहे. हे मत्सालय येत्या एका वर्षात उभारण्यात येणार असून त्यासाठी पालिका ४४ कोटी रुपये खर्च करणार आहे. (international standard aquarium in Penguin Room in the rani baug byculla mumbai)

यासंदर्भातील माहिती राणी बाग व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी दिली. मुंबईत देशातील व विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी दररोज ये – जा करीत असतात. फक्त पावसाळ्यात बाहेरील पर्यटकांची संख्या काहीशी कमी होते. मात्र जेव्हापासून राणीच्या बागेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘झू पार्क’ बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तेव्हापासून राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी वाढायला लागली आहे. विशेष म्हणजे राणी बागेचे प्रवेश शुल्क वाढवूनही पर्यटकांच्या गर्दीत दिवसागणिक भर पडत चालली आहे. त्यामुळे राणी बागेच्या उत्पन्नातही काहीशी वाढ होत आहे.

राणीच्या बागेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क बनविण्याचा संकल्प शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वीच सोडला होता. त्यात या महत्वाच्या कामात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केल्याने राणीची बाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क बनण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहे. राणीच्या बागेत लवकरच पांढरे सिंह दिसणार आहेत.

असे असणार मत्सालय

पेंग्विन कक्षात जेथे पारदर्शक काचेत पेंग्विन पक्षी ठेवण्यात आले आहेत, नेमके त्याच्या समोरील जागेत अंदाजे ६०० चौ. फूट जागेत देश – विदेशातील लहान – मोठे रंगीबिरंगी मासे पारदर्शक काचेच्या चार टँकमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तसेच, हे मासे सिलिंडरसारख्या पारदर्शक काचेच्या हंडीत दिसतील. त्याचप्रमाणे, विदेशात जसे टनेल बनवून पारदर्शक काचेतून मासे बघायला मिळतात, सेम तसाच नजारा राणीच्या बागेत पर्यटकांना बघायला मिळणार आहे. या मत्सालयात पर्यटकांना रंगीत मासे जवळून बघण्यासाठी दोन टनेल उभारण्यात येणार आहेत. या टनेलमधून पर्यटकांना ये – जा करताना पारदर्शक काचेतून अगदी जवळून विविध आकाराचे रंगबिरंगी मासे बघण्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.

हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डोम पद्धतीचे मत्सालय उभारण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केलेली आहे. या मत्सालय उभारणीसाठी पालिका ४४ कोटी रुपये खर्च करणार आहे. वर्कऑर्डर काढल्यानंतर कंत्राटदाराने पुढील वर्षभरात हे मत्सालय उभारण्याचे काम करायचे आहे. राणीच्या बागेची सफर करायला आलेल्या पर्यटकांना पेंग्विन कक्षात एकाच फेरीत एकाच वेळी, पेंग्विन व समोरील भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालय बघायला मिळणार असल्याने पर्यटकांचा विशेषतः बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा होणार आहे.