ट्रॉमा केअर रुग्णालयातील घटनेची चौकशी करा; विरोधी पक्षनेत्यांची मागणी

शनिवारी मध्यरात्री दीड तासांमध्ये आयसीयूमध्ये दाखल सात रुग्णांचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी दाबाने झाल्याने तांत्रिक कारणाने मृत्यू झाला आहे.

जोगेश्वरीतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री दीड तासांमध्ये आयसीयूमध्ये दाखल सात रुग्णांचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी दाबाने झाल्याने तांत्रिक कारणाने मृत्यू झाला आहे. मुंबईसाठी ही सर्वांत लाजीरवाणी गोष्ट असून आठ दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या अधिक्षकांनी गॅस पाईप लाईनची दुरुस्ती करणाऱ्या तांत्रिक कामगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु त्यामुळे या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ट्रॉमा केअर रुग्णालयातील या घटनेची स्वतंत्र चौकशी करतानाच मुंबईतील केईएम, शीव, नायर तसेच कांदिवलीतील शताब्दी आदी रुग्णालयांमधूनही अशाचप्रकारे तक्रार येत असल्याने तेथील आयसीयूतील मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याची मागणी महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केले आहे.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजीचा निषेध केला आहे. कोरोना कोविड- १९च्या विषाणुची बाधा आता अनेकांना होवू लागली असून त्यामुळे काहींचे मृत्यूही होत आहे. आतापर्यंत १२७९ रुग्णांचे मृत्यू मुंबईत झाले आहे. मात्र, यातील काही रुग्णांचे मृत्यू हे आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर झालेले आहेत. त्यामुळे आयसीयूमध्ये व्हेंटीलेटर्संना कमी दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने काही प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. परंतु जोगेश्वरी येथील मुंबई महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री अशाचप्रकारच्या तांत्रिक कारणांमुळे ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यामुळे अवघ्या दीड तासात सात रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी रुग्णालयात एकही तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हता.

कोरोनामुळे आधीच आपण लोकांचे जीव वाचवू शकत नाही आणि दुसरीकडे अशाप्रकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात असतील तर अशाप्रकारच्या निष्काळजीपणा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या अधिक्षकांनी आठ दिवसांपूर्वी तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तरीही त्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे याची या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ट्रॉमा केअर रुग्णालयाबरोबरच मुंबईतील केईएम, शीव, नायर, कांदिवली शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातही अशाच प्रकारच्या तक्रारी यापूर्वी येत होत्या. त्यामुळे ट्रॉमा रुग्णालयाची स्वतंत्र चौकशी करतानाच मुंबईतील अन्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्रणालीतील बिघाडामुळे झालेल्या मृत्यूंचीही चौकशी व्हावी,असे मला वाटते. त्यामुळे यासर्व घटनेची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर केला जावा.

महापालिकेची मुंबईत रुग्णालयांची एवढी मोठी साखळी असून सर्वात मोठी आरोग्य यंत्रणा राबवणारी म्हणून मुंबई महापालिकेचा नावलौकीक आहे. परंतु त्याच महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनचा योग्य पुरवठा न झाल्याने रुग्णांचे मृत्यू होणे ही बाब संतापजनक आहे. मुंबईकर आधीच कोरोनामुळे भीतीच्या छायेखाली जगत आहे. आधीच उपचार मिळताना त्यांची दमछाक होते. त्यातच रुग्णालयात दाखल केल्यानंतर, केवळ तांत्रिक कारणांमुळे त्यांच्यावर मृत्यू ओढवणे ही बाब चिंताजनक असून केवळ महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच या रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयात मागील आठवडाभरात झालेले मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा सदोष ऑक्सिजन पुरवठ्यामुळे झालेले नाहीत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य व पुरेपूर काळजी घेऊन त्यांना आवश्यक ते औषधोपचार देण्यात येत आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आवश्यक आहे, त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल, याची खात्री करण्यात येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची गरज तसेच भविष्याची आवश्यकता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच मागील आठवड्यात झालेल्या रुग्णांच्या मृत्युंसंदर्भात महानगरपालिकेच्या वतीने ‘मृत्यू परिक्षण समिती’ व राज्य टास्क फोर्स यांच्यावतीने देखील चौकशी करण्यात येणार महापालिकेने प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.