घरताज्या घडामोडीबिहार पूल दुर्घटनेचा अहवाल तपासल्यानंतरच गोरेगाव-मुलुंड पुलाबाबत निर्णय : आयुक्त इकबाल चहल

बिहार पूल दुर्घटनेचा अहवाल तपासल्यानंतरच गोरेगाव-मुलुंड पुलाबाबत निर्णय : आयुक्त इकबाल चहल

Subscribe

मुंबईतील गोरेगाव- मुलुंड उड्डाण पुलाचे कंत्राट आयआयटीच्या मान्यतेनंतरच संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ प्रसिद्धीमाध्यमांच्या बातम्यांवरून सदर पूल व कंत्राटदार याबाबत निर्णय घेता येणार नाही. बिहारमधील गंगा नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा अहवाल तपासल्यानंतरच निर्णय घेता येईल, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले आहे.

बिहारमधील नदीवरील पुलाचे चार स्तंभ कोसळल्याची दुर्घटना गेल्याच आठवड्यात घडली. त्याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले. कारण की, बिहारमधील पुलाचे काम व मुंबईमधील गोरेगाव-मुलुंड उड्डाण पुलाचे काम पाहणारा कंत्राटदार एकच आहे. याप्रकरणी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी वरीलप्रमाणे स्पष्टीकरण देत हात झटकण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, मंगळवारी मुंबईतील काही महत्वाच्या समस्या, प्रश्न, विकासकामे आदींबाबत पालिका आयुक्त इकबाल चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आयुक्त चहल यांनी पालिकेची बाजू मांडली.

बिहारमधील गंगा नदीवर १,७१० कोटींचा पूल बांधण्याचे काम एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीतर्फे सुरू आहे. याच कंत्राटदाराला पालिकेने मुलुंड – गोरेगाव लिंक रोड अंतर्गत दोन ६ पदरी उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा उन्नत मार्गाचे ६६६ कोटी रुपयांचे कंत्राटकाम मुंबई महापालिकेने दिले आहे.

- Advertisement -

मात्र बिहारमधील नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबईतील पुलाच्या कामांची व झाडाझडती घ्यावी व चौकशी करावी. त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे व दुसरा चांगला कंत्राटदार नेमण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सोमवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

मात्र, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, कोणाची मागणी व वृत्तपत्रात आलेल्या बातम्यावरुन कुठलाही निर्णय घेणे शक्य नाही. बिहार राज्यातील पूल दुर्घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यात येईल. तसेच गोरेगाव मुलुंड उड्डाणपुलाचे काम आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालानंतर व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांनी बांधकाम योग्य होत असल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतरच काम सुरु करण्यात आल्याचे चहल यांनी स्पष्टीकरण देत हातवर केले.


हेही वाचा : मोदी @ ९ हे अभियान लोकसभा मतदारसंघात व्यापक स्वरुपात राबविणार : नारायण राणे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -