मुंबईतही ‘बालिका वधू’! आरोपी पतीला कांदिवलीमधून अटक

aurangabad wedding ruckus after bride goes missing

बालविवाहाची कुप्रथा रोखण्यासाठी २००६मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात येउनही सुयोग्य नियमांअभावी महाराष्ट्रात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीच होत नाही. व्यापक जनजागृती मोहीम राबवूनही बालविवाह थांबत नसल्याने केवळ गावखेडेच नाही, तर शहरांतील परिस्थितीही चिंताजनक बनत चालली आहे. कुपोषणग्रस्त नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षांत सुमारे १० हजार अल्पवयीन मुलींचा बालविवाह झाल्याचे उघड झालेले असताना मुंबईसारख्या शहरातही बालविवाहासारखे प्रकार घडत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी पतीला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी न्यायालयाने सध्या पोलीस कोठडीत केली आहे.

सुशीलकुमार लखीराम राजपूत असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी मालाड येथील समाजसेवकांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यांची एक मैत्रीण असून ती कांदिवली येथे राहते. ती कांदिवलीतील स्कायवॉक परिसरात काही लहान मुलांना शिकवते. तिच्याकडे एक १२ वर्षांची मुलगी शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून ती शिकवणीसाठी येत नव्हती. त्यामुळे तिने इतर मुलांकडे तिची विचारपूस केली. यावेळी तिला या मुलाकडून तिचे लग्न झाल्याचे समजले. ही मुलगी १२ वर्षांची होती. तिचे लग्न झाल्याची माहिती ऐकून तिला धक्काच बसला. त्यामुळे तिने तक्रारदारांना फोन करून या मुलीचा शोध घेण्यासाठी मदतीची विनंती केली होती.

या घटनेनंतर या महिलेने तक्रारदारासह इतर पदाधिकार्‍यांच्या मदतीने या मुलीचा शोध घेतला होता. ही शोधमोहीम सुरू असताना सोमवार १ ऑगस्टला दुपारी तिला कांदिवलीतील लोखंडवाला टाऊनशीप शाळा परिसरातून त्यांनी ताब्यात घेतले. ही माहिती कंट्रोल रुमला दिल्यानंतर समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस ठाण्यात आल्यानंतर या मुलीची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीत तिचे २३ जून २०२२ रोजी सुशीलकुमारसोबत कांदिवलीतच लग्न झाल्याचे उघडकीस आले. तो नोकरी करीत असून सध्या कांदिवलीतील हनुमाननगर, भोसले चाळीत राहतो. लग्नानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध आले का, याबाबत विचारणा केल्यानंतर तिने तसे संबंध आले नसल्याचे सांगितले. तिने स्वखुशीने तिच्या पालकांच्या मर्जीने हा विवाह केला होता.

तिच्या पालकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना तिचे वय १२ वर्षे दोन महिने आणि दोन दिवस असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी पती सुशीलकुमार राजपूत याच्याविरुद्ध बालविवाह कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यात नंतर त्याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलगी अल्पवयीन आहे असे माहीत असतानाही त्याने तिच्याशी बालविवाह करून बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.