आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आता यू ट्यूबवर ऑनलाईन धडे!

iti syllabus videos

कोरोनामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नसल्याने अनेक शाळा आणि कॉलेजने ई लर्निंगवर भर दिला आहे. त्यापाठोपाठ आता आयटीआयच्या विद्यार्थ्याना ई लर्निंगचे धडे देण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना घरातूनच धडे गिरवणे शक्य व्हावे यासाठी संचालनालयाने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले असून विद्यार्थ्यांनी चॅनेल सबस्क्राईब करताच त्यांना सर्व धडे ऑनलाइन मिळणार आहेत.

ई लेक्चर, सेमिनार, गेस्ट लेक्चरचा समावेश

कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ई लर्निंग
अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी संचालनालयाने ‘डीव्हीईटी ई लर्निंग’ नावाने स्वतः चे यूट्यूब चॅनेल तयार केले आहे. आयटीआयमधील प्रत्येक शिक्षकाने आपापल्या ट्रेडमधील विषयांच्या पाठांचे व्हिडिओ बनवून ते संचालनालयाकडे पाठवायचे आहेत. त्यानंतर ते व्हिडिओ संचालनालयाकडून यूट्यूब चॅनेलवर टाकण्यात येणार आहेत. यामध्ये ई लेक्चर, सेमिनार, गेस्ट लेक्चर यांचा समावेश असणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्य अवगत करणे शक्य होणार आहे.

५ हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स

या व्हिडिओमध्ये शिक्षकांना विषयाच्या अनुरूप इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेचा वापर करता येणार आहे. त्यामुळे हे
व्हिडिओ विद्यार्थ्यांना समजण्यासाठी अधिकच सुलभ असणार आहेत. व्हिडीओ अभ्यासक्रमाशी संबंधित असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. आतापर्यंत संचालनालयाकडून ‘डीव्हीईटी ई लर्निंग’ या यूट्यूब चॅनेलवर विविध ट्रेडचे १०० पेक्षा जास्त व्हिडिओ टाकण्यात आले आहेत. तर हे चॅनेल अवघ्या काही दिवसांत पाच हजारपेक्षा अधिक जणांनी सबस्क्राईब केले आहे. या यूट्यूब चॅनेलवर टाकण्यात येणाऱ्या व्हिडीओंवर संबंधित कोर्सचे नाव आणि त्यानंतर पाठाचे नाव देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना आपल्याला हवा असलेला व्हिडीओ शोधणे सहज शक्य होणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली.