जे. जे. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा; औषधांच्या खर्चामुळे रुग्णांकडून संताप

मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा असल्याचे उघडकीस आले आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीस, ताप, गर्भवती रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे रुग्णांना बाहेरील मेडिकल स्टोअरमधून विकत घ्यावी लागत आहेत.

मुंबईसह राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सर्व रुग्णालयांना पुरेसा औषध साठा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्यातील महत्वाचे रुग्णालय असलेल्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा असल्याचे उघडकीस आले आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीस, ताप, गर्भवती रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे रुग्णांना बाहेरील मेडिकल स्टोअरमधून विकत घ्यावी लागत आहेत. इतकेच नव्हे तर शस्त्रक्रियेसाठी लागणारे ब्लेड, युरिन बॅग, सिरींज यासारखी वैद्यकीय साधनेही रुग्णांना विकत आणण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत असून, त्याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील महत्वाचे रुग्णालय असलेल्या जे.जे. रुग्णालयामध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ताप, सर्दी यासारख्या सामान्य आजारांपासून मधुमेह, रक्तदाब यासारख्या सर्वच आजारांवरील औषधे रुग्णालयात उपलब्ध नाहीत. ताप आलेल्या रुग्णांना देण्यात येणारे पॅरासिटेमॉल हे साधे औषध रुग्णालयात उपलब्ध नाही. मधुमेह, रक्तदाबाची औषधे घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना एकही औषध रुग्णालयातून मिळत नाही. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाची असलेली अ‍ॅट्रोवेस्टा, अ‍ॅसिटीसायलिक अ‍ॅसिड, फॉलिक अ‍ॅसिड ही औषधेही रुग्णांना विकत घेण्यास सांगण्यात येते. रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार्‍या रुग्णांना फक्त खाटेची सुविधा वगळली तर सर्व औषधे विकत आणण्यास सांगण्यात येते. शस्त्रक्रिया असणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना युरिन बॅग, हॅण्डग्लोव्हज, सिरिंज, पॅरासिटामोल इंजेक्शन, बेशुद्ध करण्यासाठी लागणारे फेनटानायल सायट्रेट, त्याचप्रमाणे अ‍ॅमोक्सिसायलीन, मेरोपेनेम, पिपेरासिलिन, टॅझोबॅक्टम यासारखी अँटिबायोटिक इंजेक्शनही रुग्णांच्या नातेवाईकांना विकत आणण्यास सांगितले जाते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना देण्यात येणारे अझिथ्रोमायसिन आणि हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड ही औषधेही उपलब्ध नाहीत. मलमपट्टी तसेच अन्य इंजेक्शनसाठी वापरण्यात येणारे स्टेराईल वॉटर आणि आयव्हीसुद्धा रुग्णांना विकत आणण्यास सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हेपेटायटीस बीचे इंजेक्शन, सर्पदंशावरील इंजेक्शनही रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

जे.जे. रुग्णालयामधील औषधांच्या तुटवड्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. रुग्णालयामध्ये महत्वाच्या औषधांचा साठा नसणे हे सरकारचे तसेच रुग्णालयाला औषध पुरवणार्‍या हाफकिन बायो फार्मासिट्युकलचे अपयश आहे.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर असोसिएशन