कंगनाचा दावा खोटा आणि कोर्टाची दिशाभूल करणारा; जावेद अख्तर यांचा आरोप

कंगनाचा दावा खोटा आणि कोर्टाची दिशाभूल करणारा; जावेद अख्तर यांचा आरोप

अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. कंगनाने जाणीवपूर्वक सत्य माहिती दडवून न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असा आरोप अख्तर यांनी केला आहे. कंगनाने पारपत्र नूतनीकरण करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर सुनावणी दरम्यान तिच्या विरोधात न्यायालयात एकही फौजदारी खटला प्रलंबित नाही, असे विधान तिच्या वतीने तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केले आहे.

कंगनाचं विधान न्यायालयाची दिशाभूल करणारं

कंगनाच्या वतीने तिच्या वकीलांनी केलेले हे विधान खोटं आणि न्यायालयाची दिशाभूल करणारे आहे, असा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. ज्यामध्ये कोर्टाने तिला अजामीनपात्र वॉरंटही बजावलं होतं. त्यामुळे कंगनाच्या वकिलांनी केवळ दोन फौजदारी तक्रारींची माहिती न्यायालयात दिली आणि अख्तर यांनी केलेल्या खटल्याची माहिती लपवून ठेवली, असा आरोप या याचिकेतून केला आहे. या खटल्याची माहिती कंगनाला आहे आणि तिने त्याबद्दल न्यायालयात सांगायला हवं होतं, असेही अख्तर यांनी सांगितले आहे.

कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल

दिंडोशी सत्र न्यायालयात जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने जुलैमध्ये एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यामध्ये जावेद बॉलिवूडमधील गटबाजीला प्रोत्साहन देतात आणि त्यांनी कंगनाला धमकीदेखील दिली होती, असे म्हटले होते. कंगनाची ही मुलाखत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर घेण्यात आली होती. एका तासाच्या या मुलाखतीमध्ये कंगनाने केवळ जावेद यांच्यावरच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवरही खळबळजनक आरोप केले होते. जावेद अख्तर यांना तर तिने ‘सुसाईड गँग’चे सदस्य असे संबोधले होते. कंगनाने केलेल्या या आरोपांविरोधात जावेद यांनी तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. याप्रकरणी कंगनानं कोर्टापुढे हजेरी लावत आपल्याविरोधातील वॉरंट रद्द करून घेतले असल्याचे सांगितले जात आहे.