घरमुंबईमंत्रिमंडळाचे निर्णय बदलण्याचे अधिकार मुख्य सचिवांना कुणी दिलेत?

मंत्रिमंडळाचे निर्णय बदलण्याचे अधिकार मुख्य सचिवांना कुणी दिलेत?

Subscribe

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुख्य सचिव सीताराम कुंटेंबाबत नाराजी 

राज्याच्या कॅबिनेटमध्ये एखादा निर्णय झाला असेल तर तो निर्णय बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही. मग ते मुख्य सचिव असले म्हणून काय झाले? आम्ही एवढी वर्षे राजकारणात आहोत. मंत्रिमंडळ म्हणून काही आमचे अधिकार आहेत की नाहीत? जर उच्चाधिकार समिती ही मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली असताना अतिरिक्त मुख्य सचिवांच्या खांद्यावर जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. कोरोनाच्या काळात तात्काळ खरेदी करण्यासाठी जर समिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमली असेल तर मागील आठवड्यात याबाबत किती बैठका झाल्या? ऑक्सिजन तुटवडा, रेमडेसिवीर, कॉन्सन्ट्रेटरबाबत काय हालचाल झाली याबाबत मंत्रिमंडळाला कळणे क्रमप्राप्त आहे. इकडे शेकडो लोकांचा जीव ऑक्सिजनअभावी, रेमडेसिवीरअभावी जात असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आणि मंत्री म्हणून आमचा उपयोग काय, असे एकामागून एक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केल्याने उपस्थित मंत्री, अधिकारी आणि वर्षावरून मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वच अवाक झाले.

जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांप्रमाणेच शांत, संयमी आणि कुणालाही न दुखावता आपले वा खात्याचे काम करण्यात वर्षानुवर्षे हातखंडा. मात्र, शांत असणार्‍या जयंतरावांना झाले काय असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्व मंत्री यांना पडला. तर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पारा चढण्याचे कारण काय हे काही मिनिटे मुख्यमंत्र्यांनाही कळले नाही. त्यामुळे कॅबिनेटच्या २८ एप्रिलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची सुरुवातच काहीशी वादळी झाल्याची माहिती एका वरिष्ठ मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

- Advertisement -

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरची औषधे न मिळाल्याने अनेक रूग्ण दगावत असल्याचा अनुभव महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांना आणि मंत्र्यांना येत होता. त्यामुळेच २० एप्रिलच्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री यांनी तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करून ऑक्सिजन, रेेमडेसिवीर खरेदीबाबत तात्काळ मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती नेमावी आणि त्यांनी तात्काळ खरेदीबाबत बैठका आणि उपाययोजना कराव्यात अशा सूचना सर्वच मंत्र्यांनी केल्या. तसेच या बैठकीचे इतिवृत्तांत मंजूर झाले असे गृहीत धरून उपाययोजना २१ एप्रिलपासून सुरू कराव्यात अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मंत्रिमंडळाने केल्या.

त्या दरम्यानच्या काळात २२ एप्रिल रोजी नाशिकची दुर्दैवी घटना ज्यात डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात २२ जणांचा ऑक्सिजनअभावी हकनाक बळी गेला तर त्याच्या दोन दिवसांनी २४ एप्रिलला विरारच्या गोविंद वल्लभ रूग्णालयात १६ जणांचे बळी गेले. त्यामुळे राज्यभरात महाविकास आघाडी आणि आरोग्य खात्यातील चालढकलपणा, वेळकाढूपणाबाबत प्रचंड नाराजी आणि रोष होता. त्यामुळे या दोन दुर्घटनानंतर झालेली २८ एप्रिलची बैठक वादळी होईल याची कल्पना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना नसावी, असेही तो मंत्री म्हणाला.

- Advertisement -

२८ एप्रिलची बैठक सुरू होताच मुख्य सचिवांकडून मागील बैठकीचे इतिवृत्तांत वाचून दाखवायला सुरुवात झाली तेव्हा जलसंपदामंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटेंना विचारणा केली की आपण उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असताना मागील आठवड्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन प्लान्ट, रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत किती बैठका घेतल्या याची माहिती आम्हाला मिळेल का? यावर कुंटे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास हे या समितीचे सदस्य असल्याचे सांगताच मंत्री पाटील प्रचंड संतापले आणि कॅबिनेटचे वातावरण गंभीर झाले.

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा कॅबिनेटचा निर्णय झालेला असताना आपण परस्पर अतिरिक्त मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली कशी? आपणाला कुणी अधिकार दिला? अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यावर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांना नेमके काय झाले याची कल्पनाच येईना. आरोग्य विभागात कोणताही निर्णय वेळेवर होत नाही, लोकांचे जीव जाताहेत तरी आपण कामाची गती वाढवणार आहोत की नाही, असे म्हणत आम्ही एवढी वर्षे मंत्रिमंडळात आहोत पण असे कधी झाले नाही सांगत आपली नाराजी बोलून दाखवली.

त्यावर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आरोग्य खात्याच्या सोयीसुविधा अपग्रेड करण्याबाबत समिती नेमण्यात आली असून याबाबत लवकरच निर्णय घेवू, असे सांगून आपली मान वाचवली. पण नेहमी शांत असणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा पारा का चढला अशीच चर्चा मंत्रालयात सुरू होती. या पार्श्वभूमीवर आज होणारी कॅबिनेटची बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. कारण मुख्य सचिव सीताराम कुंटे वा आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी पदभार सांभाळताना त्यासोबत जबाबदारीही पूर्ण केली पाहिजे, अशी अपेक्षा आता महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री बोलून दाखवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -