घरमुंबईकल्पवृक्षाच्या सावलीत फुलताना...

कल्पवृक्षाच्या सावलीत फुलताना…

Subscribe

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय मतांबद्दल, शैलीबद्दल, सामाजिक भूमिकेबद्दल, ती मांडण्याच्या पद्धतीबद्दल मतमतांतरे असू शकतात, पण ते काही असलं तरी जितेंद्र आव्हाड या व्यक्तिमत्वातील स्वभावाच्या एका छोट्याशा कोपर्‍यात असं काही आहे की त्यांचा एखादा मित्र, हितशत्रू किंवा अगदी कोणीही त्यांना त्रास देताना दुसर्‍यांदा नक्कीच विचार करू शकतो. मी तर आव्हाड यांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा मित्र-हितचिंतक आहे, पण त्यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देताना त्यांच्या व्यक्तिरेखांच्या काही छटांवर प्रामाणिकपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या हजारो समर्थकांपैकी काहींना ते आवडेल तर काहींना आवडणारही नाही. पण आयुष्यात तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे व्यक्त होणं हे एका चांगल्या माणसाचं लक्षण असतं, त्या प्रामाणिकपणाच्या जोरावरच हे शब्दप्रपंचाचं धाडस. कारण शरद पवार नावाच्या कल्पवृक्षाच्या छायेत वाढलेलं एक असं झाड आहे जे भविष्यात काही वाट चुकलेल्या पांथस्थाना हक्काचं स्थान वाटण्याइतपत सावली देण्याची या झाडाची दानतही आहे.

गेल्या वर्षीचा वाढदिवस आव्हाडांसाठी खास होता, कारण त्यांनी कोविडसारखा आजार बळावला तरी त्यावर मात करत एक नवी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतरच जवळपास वर्षभराचा काळ आव्हाडांसाठी एक नेता म्हणून आणि मंत्री म्हणून अधिकच आव्हानांचा आणि सतत लक्षवेधी बातम्यांमध्ये केंद्रस्थानी राहण्याचा होता. त्या सगळ्याच गोष्टींसाठी आव्हाड कारणीभूत होते, असं म्हणायचं काही कारण नाही. पण त्यांच्या वाणीमुळेही आव्हाड अनेकदा अडचणीत आलेले आहेत. आव्हाडांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकच गट तो म्हणजे ‘शरद पवार’! मी तर म्हणेन ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत यापेक्षा ते ‘शरद पवार’ नावाच्या पक्षात आहेत. बहुदा त्यामुळेच ते जितके सुरक्षित आहेत त्याहीपेक्षा ते असुरक्षितही आहेत. पण शेवटी आव्हाडांनी आपला राजकीय जन्मदाता आयुष्यभरासाठी ठामपणे ठरवला असल्यामुळेच त्यांच्यासाठी सारं काही पवारांच्या चरणांतच आहे. पण याच गोष्टीची असूया पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या अनेकांना आहे, याची जाणीवही आव्हाड यांना आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री हे महत्त्वाचं खातं जितेंद्र आव्हाडांकडे सुरुवातीपासून आहे.पवारांचा असलेला ठाम विश्वास आणि या लोककल्याणकारी खात्यासाठी लागणारी ऊर्जा या दोन्ही गोष्टी आव्हाडांकडे असल्यामुळे हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलंय. आव्हाडांची शैली, देहबोली यामुळे गेला वर्षभराचा कालावधी आव्हानात्मकच ठरलाय. अर्थात आव्हानं हा काही या ‘फायटर’ नेत्यासाठी नवा विषय नाहीय. ठाणा कॉलेजमध्ये बीएस्सी होण्याआधीपासून विद्यार्थी संघटनेतली कारकीर्द असू द्या किंवा काल-परवा उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून पवारांनी केलेला राज्याभिषेक प्रत्येक वेळी साहेबांचा शब्द हाच ‘आदेश’ असं म्हणतच आव्हाडांचं राजकारण सुरू आहे. सध्या देशात मोदींच्या समोर सक्षम विरोधी नेता म्हणून आव्हान उभं करण्याचा प्रयत्न आपल्याला महाराष्ट्रापासून पश्चिम बंगालपर्यंत दिसून येतोय. त्यामध्ये देशाच्या चारी कोपर्‍यात जर कोणाच्या नावाची मोदींच्या विरोधासाठी चर्चा असेल तर ती शरद पवारांचीच. याचं कारण पवारांचे वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलेले राजकीय संबंध आणि सर्वव्यापी अभ्यासूवृत्ती. पण त्याच वेळेला पवारांची ‘राजकीय अविश्वसनीयता’ हा देखील एक मुद्दा विश्लेषकांकडून आवर्जून चर्चेत आणला जातो. पण म्हणून पवारांची एखादी गोष्ट उभी करण्याचं कसब, कौशल्य कुणीही नाकारू शकत नाही. अगदी तसंच जितेंद्र आव्हाड यांचंही आहे.

- Advertisement -

गेल्या ३५ वर्षांत आव्हाड यांनी राजकारणी, पोलीस, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, चित्रपट कलाकार, बिल्डर असे हजारो मित्र जोडले. इतकंच काय पण इथे उल्लेख करता येणार नाही अशा क्षेत्रातही त्यांचा ‘दोस्ताना’ आहे. यातल्या खूप जणांशी मी बोललो. माझे प्रश्न काही असले तरी चर्चा एकाच बिंदूवर पूर्ण व्हायची…”वो यारोंका यार है! पवार साब की चरणोंमें उसकी जन्नत है!” हे ऐकल्यावर प्रश्न पडतो, इतके मित्र असणार्‍या आव्हाडांच्या विरोधकांसाठी कायम एक मंत्र ठरलाय. आव्हाड म्हणजे आगाऊपणा, आक्रस्ताळेपणा, आत्मकेंद्री अशी ‘आ’ ची बाराखडी त्यांचे विरोधक सुरू करतात. तेव्हा गेली ३५ वर्षं अगदी ठाणा कॉलेजपासूनच्या मित्रपरिवारातील एक असलेले डॉक्टर आनंद प्रधान सांगतात, आव्हाड म्हणजे आपलेपणा, आत्मविश्वास आणि आक्रमकता! ते पुढे म्हणतात, आमची दोस्ती ३५ वर्षं जुनी आहे. पण आजही मी, घनश्याम पाटील, राजन गुप्ते, आप्पा भोईर यांना जुनाच बंटी भेटतो. गावभर तो बदलल्याची चर्चा असताना आम्ही मात्र जेव्हा आमचा जुनाच ‘यारों का यार’ अनुभवतो तेव्हा आनंद तर होतो, पण त्याचवेळी आपला मित्र नव्या राजकारणाची नवी समीकरणं आपल्यावर लादत नाही याचं समाधान पण होतं. त्यामुळे आम्हीही आमच्या साचेबद्ध आयुष्यात व्यस्त असलो तरी तिथेही आमच्या मित्राचं स्थान ध्रुवतार्‍यासारखं अढळ आहे.

कोविडच्या अमानुष दिवसांत मृत्यूच्या दाढेतून डॉक्टरांनी जितेंद्र आव्हाड यांना खेचून बाहेर आणलं हे खरंय. पण त्यामागचा सूत्रधार आहे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर. आव्हाडांच्या पत्नी आणि मुलीबरोबर कसोटीच्या क्षणी वैद्यकीय गोष्टींबाबत निर्णय घेण्याचं काम मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या या हनुमानानं केलंय. तेच मिलिंद नार्वेकर सांगतात, “आव्हाड यांची आणि माझी दोस्ती दोन दशकांची. जितेंद्र मित्र म्हणून एकदम दिलदार. मैत्री आणि निष्ठा कशी निभवायची याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जितेंद्र आव्हाड. पण जिभेवरच्या तिखटपणामुळे त्यांच्या कामापेक्षा फटकळपणाचीच जास्त चर्चा होते. पण हा नेता मनानं खूपच हळवा आहे. मला वाटतं इतक्या जिंदादिल माणसानं ऋचा वहिनीचं आणि लाडक्या लेकीचं इतरांपेक्षा जास्त ऐकलं पाहिजे. कठीण वेळप्रसंगी घरातलेच आपल्या बरोबर असतात इतर कुणाही पेक्षा. जितेंद्रच्या जिभेवर तिखटपणा असला तरी, कटूता मनात कधीच नसते, अगदी त्याचा हितशत्रू असला तरी. म्हणूनच तर कार्यालयापासून घरापर्यंत लोकांची गर्दी असते. हुशारी, हजरजबाबीपणा यापेक्षाही मला भावते ती त्यांची पवारसाहेबांवरची कमालीची स्वामीनिष्ठा…एकदम २४ कॅरेट सोन्यासारखी!”

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी बांधलेल्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची चर्चा मुंबई ते दिल्लीपर्यंत होत असते. त्यात स्वतः आव्हाड यांचं काम आणि कौशल्य आहेच. पण या श्रेयाचा प्रमुख शिल्पकार आहे ठाण्यातला राष्ट्रवादीचा नेता नजीब मुल्ला. हा तरुण नेता म्हणजे आव्हाडांवर रात्री अपरात्री जीव ओवाळून टाकायला तयार असतो. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि खास मियॉभाई स्टाईलमध्ये संवादकौशल्य असलेल्या या नेत्याला दुर्लक्षून राजकीय आव्हाड लिहिणं कठीण आहे. या मुद्यावर छेडल्यावर नजीब मुल्ला सांगतो, ‘मी…आणि ’बॉस’चा स्पर्धक होऊच शकत नाही. लोकं काही जरी बोलले तरी मला वस्तूस्थिती माहितीय. आव्हाड साहेब ज्या ठिकाणी पोहचू शकतात त्याचा आपण विचारही करु शकत नाही. त्यांनी वाघासारखं मतदारसंघात कामं केलंय. मोठ्या साहेबांचा आशीर्वाद आणि दादांच्या, सुप्रियाताईंच्या पाठिंब्यामुळे आव्हाड साहेबांनी तुफान काम केलंय. पण इतक्या बिझी शेड्युलमध्ये छोट्याशा माणसालाही ते आधार देतायत. माझ्यासाठी तर ते मोठा भाऊ, गाईड, फिलॉसॉफर लीडर आणि बरंच काही आहेत.’

आव्हाड यांचा स्वभाव बंडखोर असल्याने व्यक्त होणं, विद्रोह करणं हे त्यांचे स्थायीभाव आहेत. माध्यमस्नेही असलेल्या आव्हाड यांना माध्यमांबरोबरीनेच समाज माध्यमंही कवेत घ्यावी असं वाटत असतं. साहाजिकच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांच्या इतकं झटपट व्यक्त होणारा नेता दुसरा नाही. अगदी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनाही अनेक गोष्टी उशिरा सुचलेल्या असतात तोपर्यंत आव्हाड त्या झटपट व्यक्त करून मोकळे झालेले असतात. बहुदा त्यासाठीच दिवसभर आव्हाड समाजमाध्यमांवर रेंगाळताना आपल्याला दिसतात. हातातला आयफोन आणि त्यावरून जनमानसापर्यंत जाणार्‍या समाजकारणातल्या घटना, राजकारणातल्या घडामोडीच्या नोंदी आणि गोष्टी आव्हाड यांना लीलया जमतात. आव्हाडांचा स्थायीभाव म्हणजे शत्रूवरही वेळ आली की तितकंच प्रामाणिक प्रेम करतात आणि मोकळे होतात. त्याचा जमाखर्च मांडत बसत नाहीत.

बीडीडी चाळींचा पुनर्विकासासारखा राज्यभरातील गृहनिर्माण क्षेत्रातला मैलाचा दगड आव्हाडांनी साकारलेला आहे. अर्थात तो या आधीच्या सरकारने तसा प्रयत्न केला होता, पण जेव्हा बीडीडी चाळकर्‍यांचा पहिला जथ्था जेव्हा पुनर्विकास केलेल्या आपल्या स्वप्नवत घरात राहायला जाईल, त्याच वेळेस आव्हाडांचं घरांचं सचित्र वर्णन करणं किंवा डोळ्यात करुणा भाव आणून व्यक्त होणं याला अर्थ प्राप्त होणार आहे. जितेंद्र आव्हाड हा सामान्य माणसाबद्दल कणव असलेला, तळमळ असलेला आणि कष्टकर्‍यांच्या दुःखाची पुरती जाण असलेला असा हा नेता आहे. जितेंद्र आव्हाडांमध्ये प्रदेशाध्यक्ष होण्याची क्षमता आहे, असं आव्हाड यांच्या काही निरीक्षकांना वाटते, पण त्याच वेळेला यासाठी आव्हाडांना समोरच्या माणसाचं ऐकून घेण्याची सवय लावून घ्यावी लागेल. आव्हाड हुशार, सूक्ष्म निरीक्षक आणि हजरजबाबीही आहेत, पण आपल्या अंगचे हेच गुण जनमानसात जाताना अधिक मोठ्या प्रमाणात व्यक्त करायचे नसतात तर किंबहुना, आपण समोरच्याकडून ऐकूनच घ्यायचं असतं.

समोरच्याच लक्षपूर्वक ऐकून घेण्याची जी गोष्ट पवारांकडे ५० वर्षं राजकारणात काढल्यावरही आपल्याला सातत्याने बघायला मिळते तीच आव्हाडांनी आत्मसात करायला हवी, असे वाटते. ज्येष्ठ संपादक स्व. गोविंदराव तळवलकर, डॉ. रवी बापट, कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक, क्रिकेटपटू माधव आपटे, प्रा. रत्नाकर शेट्टी अशी एक नाही तर हजारोंच्या पटीतल्या मंडळींकडून पवारांनी वेगवेगळे विषय समजून घेतले. बहुधा त्यामुळेच थोरल्या पवारांना ‘कल्पवृक्षत्व’ प्राप्त झालंय. आव्हाडांचे सध्या फुलायचे दिवस आहेत. फुलताना त्यांना काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागणार आहे. शरद पवारांसारख्या कल्पवृक्षाच्या छायेत फुलण्याचं सौभाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. ते जितेंद्र आव्हाडांसारख्या मित्रांच्या मित्राला भरभरून लाभलंय. हा फुललेला बहर त्यांच्या उंबरठ्यावर पोहचणार्‍या प्रत्येक इमानदार गरजवंतावर उधळण्याची शक्ती जितेंद्र आव्हाड नावाच्या फायटर नेत्याला मिळो हीच वाढदिवशी शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -