Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई भुयारी मार्ग, पुलांसाठी पालिकेत १८ सल्लागारांचे जंबो पॅनल

भुयारी मार्ग, पुलांसाठी पालिकेत १८ सल्लागारांचे जंबो पॅनल

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेने भुयारी मार्ग, पूल, उड्डाणपूल, पादचारी मार्ग आदी बांधकामांच्या सल्ल्यासाठी १८ सल्लागारांचे जंबो पॅनेल पुढील तीन वर्षांसाठी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. सल्लागारांबाबतच्या या प्रस्तावावर वादळी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील अनेक पूल, उड्डाणपूल हे ब्रिटिशकालीन असून ते जीर्ण व धोकादायक स्थितीत आहेत. मागील काही कालावधीत अंधेरी येथील गोखले पूल, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक येथील हिमालय पूल दुर्घटना घडल्या व त्यात जीवित आणि वित्तीय हानीसुद्धा झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन हे सजग व सतर्क झाले आहे. एखाद्या पुलाची, उड्डाणपुलाची दुरुस्ती, नूतनीकरण करणे, नवीन भुयारी मार्ग बांधणे आदी कामांसाठी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेण्यात येतो.

- Advertisement -

यास्तव, पालिकेतर्फे उड्डाणपूल, पादचारी पुलांचे बांधकाम व आॅडिट आदी कामांसाठी दर तीन वर्षानी तज्ञ सल्लागाराचे पॅनेल नेमण्यात येते. यापूर्वी नेमण्यात आलेल्या सल्लागार पॅनेलची मुदत संपुष्टात आल्याने पुन्हा नवीन सल्लागार पॅनलची नेमणूक करणे आवश्यक झाले होते. त्यामुळेच पालिकेने टेंडरप्रक्रिया केली. त्यात इच्छुक ३० अर्ज खरेदी करण्यात आले. त्यापैकी २२ सल्लागारांनी प्रतिसाद दिला. मात्र त्यापैकी १८ सल्लागार हे पात्र ठरले. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत सध्या ३४० उड्डाणपूल, पादचारी पूल, भुयारी मार्ग आहेत. तसेच दरवर्षी काही नवीन पुलांची बांधकामे व दुरूस्तीची कामे केली जातात. या पुलांसाठी निविदा प्रक्रिया, संकल्पचित्रे, आराखडे तसेच पुलांची तपासणी, आॅडिट करण्यासाठी सल्लागारांची आवश्यकता भासत असल्याने हे पॅनेल नेमले जाणार आहे.

या पॅनलवरील सल्लागारांना एकूण कंत्राट रकमेवर टक्केवारी पद्धतीने मानधन दिले जाणार असून १ कोटी रुपयांपर्यंतच्या कामांसाठी ३.५० टक्के, १ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या कामांसाठी २.७५ टक्के, ५ कोटी ते १० कोटी रुपयांच्या कामांसाठी २.२५ टक्के, १० ते ५० कोटी रुपयांपर्यंतच्या कामांसाठी १.५ टक्के आणि ५० कोटी रुपयांच्यावर कामांसाठी १ टक्के मानधन प्रस्तावित करण्यात आले आहे.

- Advertisement -