नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनी पक्ष आणि पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. कैलाश गेहलोत यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना पाठवला आहे. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, कैशाश गेहलोत यांनी आपल्या पत्रातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाला ‘शीशमहल’ म्हणत अनेक आरोपही केले आहेत. (Kailash Gehlot left Arvind Kejriwal Aam Aadmi Party before Delhi assembly elections)
कैलाश गेहलोत यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, अरविंद केजरीवाल, सर्वप्रथम मी एक आमदार आणि मंत्री म्हणून मला दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याचा व प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानू इच्छितो. मात्र मला हेही सांगायचे आहे की, आज आम आदमी पक्षासमोर गंभीर आव्हाने आहेत. अंतर्गत आव्हाने, ज्या मूल्यांनी आम्हाला एकत्र आणले, ती अनेक आश्वासने पूर्ण न करता, लोकांप्रती असलेली आमची वचनबद्धता मागे टाकली आहे.
हेही वाचा – Haryana Crime : शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून रिमोटने उडवला, 13 विद्यार्थ्यांवर कारवाई
गेहलोत म्हणाले की, आपल्या यमुनेला स्वच्छ नदीत रूपांतरित करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तसे आपण करू शकलो नाही. यमुना आता कदाचित पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे. याशिवाय ‘शीशमहल’ सारखे अनेक लाजिरवाणे आणि विचित्र वाद आता सर्वांसमोर येत आहेत, त्यामुळे एक सामान्य माणूस म्हणून लोकांचा आपल्यावरील विश्वास कमी होत आहे. आणखी एक खेदाची बाब म्हणजे लोकांच्या हक्कासाठी लढण्याऐवजी आपण केवळ आपल्या राजकीय अजेंडासाठी लढत आहोत. यामुळे दिल्लीतील लोकांपर्यंत मूलभूत सेवा पोहोचवण्याची आपली क्षमताही कमकुवत झाली आहे. दिल्ली सरकारने आपला बराचसा वेळ केंद्राशी लढण्यात घालवला तर दिल्लीची खरी प्रगती होऊ शकत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
दिल्लीतील लोकांची सेवा करण्यासाठी दिला राजीनामा
दरम्यान, आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना कैलाश गेहलोत म्हणाले की, माझा राजकीय प्रवास दिल्लीतील लोकांची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने सुरू झाला असून हे मिशन मला पुढे चालू ठेवायचे आहे. यामुळे आप पक्षापासून वेगळे होण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. त्यामुळे मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. यावेळी गेहलोत यांनी आप पक्षाच्या नेतृत्वाला त्यांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कैलाश गेहलोत यांनी त्यांच्या कार्यकाळातील आप पक्षातील सहकारी आणि हितचिंतकांचेही आभार मानले.
हेही वाचा – Priyanka Gandhi : सरकार पाडण्यासाठीच्या बैठकीत उद्योगपती अदानींचे काय काम, प्रियंका गांधीचा रोकडा सवाल