घरठाणेकल्याण परिसरातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात!

कल्याण परिसरातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात!

Subscribe

ठाणे जिल्हा व मुंबई परिसरातील जनतेची तहान भागवणार्‍या उल्हास, भातसा, काळू या नद्यांचे कल्याण जवळील परिसरात अस्तित्व धोक्यात आले आहे. औद्योगिकीकरण व प्रचंड प्रमाणात शहरीकरणाने आधीच वालधुनी नदी नामशेष झाल्याचे उदाहरण ताजे असताना ठाणे जिल्ह्यातील या प्रमुख तीन नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

लोणावळ्यातील राजमाची जवळील तुंगार्ली धरणात उगम पावणारी पुढे कर्जत, बदलापूर अंबरनाथ, उल्हासनगर, मोहने असा प्रवास करणारी उल्हास नदी, कसारा घाटात घाटणदेवी, उंटदरी येथून उगम पावून अनेक नद्यांचे संगम असलेली जिच्यावर भातसा धरण बांधलेले आहे. अशी भातसा नदी, पुणे अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील पिंपळगावजोगा धरणातून उगम पावून सरळगाव, खडवली, टिटवाळा असा प्रवास करणारी काळू नदी या तिन्ही जीवनवाहिनी कल्याण जवळ येऊन एकमेकांत मिसळतात. संगमानंतर या नद्या कल्याणातील गांधारी, वडवली परिसरात खाडीमध्ये मिसळतात. पुढे हिच खाडी डोंबिवली, मुंब्रा, कळवा, ठाणे, वाशी तर उलट्या दिशेला भिंवडी, वसईच्या दिशेने अरबी समुद्रात मिसळते.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील या प्रमुख जलवाहिन्या खाडीत मिसळण्याअगोदर कल्याणजवळच्या ग्रामीण व शहरी भागातील ३०ते ३५ कि. मी. अंतराचा प्रदेश व्यापतात. या प्रमुख नद्यांच्या खोर्‍यात अनेक छोटेमोठे कारखाने वसलेले आहेत. या भागात प्रचंड प्रमाणात नागरीकरण व शहरीकरण होत आहे. मागील वीस वर्षांपासून बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, वासिंद, मुरबाड, मोहने, आंबिवली या क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांनी इमारती, भव्य संकुल तसेच चाळी बांधण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे या ठिकाणी छोटेमोठे उद्योगधंदे, हॉटेल्स, वॉटर पार्क, रिसॉर्टस्, धाबे यांची रेलचेल वाढली आहे. यातील बर्‍याच पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या मंडळींकडून नियमांचा भंग होत आहे. नागरी वस्तीतील सांडपाणी, कारखान्याचे रासायनिक पाणी, राजरोसपणे नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे या परिसरातील नदीपात्रात पाण वनस्पती वाढत आहेत. या वाढलेल्या पाणवनस्पती नद्यांचे पाणी प्रदूषित करत आहेत.

विशेष म्हणजे कल्याण नजीक सावद भागात भातसा नदीवर पिसा येथे मुंबई महानगरपालिका व मोहिली येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून कल्याण, ठाणे, मुंबई परिसराला शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. मोहने येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळच नदी पात्रात सांडपाणी व पाणवनस्पतींमुळे पाणी दूषित होत असल्याने अनेकदा पर्यावरणप्रेमी संस्थांनी नदी बचाव आंदोलने केली. मात्र, या आंदोलनाचा फारसा उपयोग होत नसल्याचेच चित्र या परिसराकडे पाहिल्यावर लक्षात येते.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने मुंबईतील मृत मिठी नदी व ठाणे जिल्ह्यातील मृत वालधुनी नदी यांना पुन:र्रजीवित करण्याकरता प्राधिकरणांची स्थापना केली. या मृत व गटारगंगा बनलेल्या नद्यांवर करोडो रुपयांचा चुराडा होत आहे. मात्र, करोडो रुपये खर्च करुनही फारसा फरक पडलेला दिसत नाही. या नदी पात्रात शहरातील लाखो लीटर सांडपाणी, मैला सोडला जात असल्याने पाणी कधीच पिण्यायोग्य होणार नाही. फारफार तर या नदी किनार्‍यांचे सौंदर्यीकरण केले जाऊ शकते. पण सद्य स्थितीला ज्या नद्या अस्तित्वात आहेत व ज्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशा नद्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर वालधुनी व मुंबईतील नद्यांची जी अवस्था झाली, तीच अवस्था या नद्यांची होण्यास वेळ लागणार नाही. आज अस्तित्व धोक्यात आलेल्या व शुद्ध पाण्यांचे प्रमुख स्त्रोत असलेल्या नद्यांच्या संवर्धनाकरता प्राधिकरण स्थापन करण्याची आवश्यकता आहे.

जलप्रदूषण नियंत्रक मंडळाकडून या नद्यांचे अस्तित्व टिकवण्याच्या कार्यवाही करण्याबाबत जे प्रयत्न चालू आहेत ते फोल ठरताना दिसत आहे. कल्याणजवळील ३० ते ३५ कि. मी.मधील नद्यांच्या खोर्‍यांचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर सक्षम यंत्रणेची उभारणी झाली पाहिजे. संशोधन, स्थानिक पर्यावरण जनतेच्या सहकार्याने विविध योजनेची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून मिठी नदी प्राधिकरणाच्या धर्तीवर या भागातील नद्यांच्या भवितव्याकरता जल प्राधिकरणाची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे.

कार्यालयामार्फत ‘अमृत २’ या टप्प्याअंतर्गत या नद्यांच्या पात्रात सोडले जात असलेले सांडपाणी थेट खाडीत सोडण्यासंदर्भात योजनांची मांडणी करण्यात येत आहे. नदीवरील पाणवनस्पती काढण्या संदर्भात लवकर पाऊले उचलली जाणार आहेत. या नदी पात्रांचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात ‘अमृत २’ अंतर्गत मे २०२० अखेरपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
– सपना कोळी, शहर अभियंता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -