घरमुंबईकल्याणातील तलावांना घरघर

कल्याणातील तलावांना घरघर

Subscribe

जलसंवर्धनाविषयी पालिका प्रशासन उदासीन

एकीकडे राज्यात दुष्काळाचे सावट पसरले असतानाच दुसरीकडे मात्र तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कल्याणात जलसंवर्धनाकडे पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येते आहे. महापालिका हद्दीत एकूण 42 तलाव असताना अवघ्या दोन तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित अनेक तलावांची दुरवस्था झाली असून, अनेक तलाव हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे 15 जुलै पर्यंतच्या पाण्याचे नियोजन लघु पाटबंधारे विभागाकडून केले जात आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे कल्याण-डोंबिवली शहरातही पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. मात्र, शहरातील जलस्त्रोतांकडे पालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीत एकूण 42 तलाव आहेत. मात्र, यातील बहुतांशी तलावांची अवस्था खूपच बिकट आहे.

- Advertisement -

कल्याणातील काळा (भगवा) तलाव आणि टिटवाळ्यातील महागणपती मंदिर तलावाचे पालिकेच्यावतीने सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, इतर तलावांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तलावांना अवकळा आली आहे. कल्याणातील टिटवाळा आणि बल्याणी या परिसरातील तलावात गाळ असल्याने ती साफ करणे गरजेचे आहे. तसेच चिंचपाडा, एफ केबीन जवळील तलाव आणि जरीमरी देवी तलावात शेवाळ साचली आहेत. ही शेवाळं साफ करावी लागणार आहेत. अटाळी, आंबिवली गाव, सापाड गाव, चक्की नाका, सोनारपाडा, घेसर तलाव, विजयनगर तलाव या तलावांमध्ये पाणी नाही. त्यामुळे हे तलाव कोरडे पडले आहेत. भटाळे तलावात शेजारील सांडपाणी जात आहे. मात्र त्यावर पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने तलावाचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी तलावाच्या साफसफाईकडे लक्ष देईल का ? असाच सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -