कमलाकर सातपुतेंचं फेसबुक खाते हॅक!

विनोदी कलाकार कमलाकर सातपुते यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

actor kamlakar satpute
अभिनेता कमलाकर सातपुते

मराठी चित्रपट अभिनेते कमलाकर सातपुते यांचे फेसबुक खाते हॅक करुन फेसबुक मैत्रिणींना भेटण्यासाठी बोलावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अभिनेते कमलाकर सातपुते यांनी कळवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन हॅकर विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून हॅकरचा शोध घेण्यात येत आहे.

अभिनेते कमलाकर सातपुते यांनी गुरुवारी कळवा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली. कळवा पोलीस ठाण्यात या हॅकर विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला असल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

मैत्रिणींना हॅकर्सपासून सावध राहण्याची सूचना

मराठी चित्रपटातील अभिनेते तसेच हास्य कलाकार कमलाकर सातपुते यांचे काही दिवसापूर्वी एका हॅकरने फेसबुक खाते हॅक केले आहे. त्यांनतर या हॅकरने अभिनेते कमलाकर सातपुते यांच्या फेसबुकवर असणाऱ्या मैत्रिणींना अज्ञातस्थळी भेटण्यासाठी बोलावत आहे. त्याचबरोबर सातपुते यांच्या मैत्रिणींना हॅकर स्वतःच्या व्हॉट्सॅपवरून त्यांच्याशी कमलाकर सातपुतेच्या नावाने गप्पा मारत आहे. काही दिवसापूर्वी सातपुते यांच्या काही मित्र -मैत्रिणींनी थेट सातपुते यांना संपर्क साधून याबाबत विचारले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कमलाकर सातपुते यांनी ताबडतोब इतर मित्र मैत्रिणींच्या मार्फत फेसबुक मैत्रिणींना या हॅकरपासून सावध राहण्याची सूचना दिली आहे.

या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाची मदत घेत असून लवकरच या हॅकरला अटक करण्यात येईल.
बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे