घरमुंबईकेईएममध्ये कर्मचाऱ्याला सुरक्षारक्षकाडून मारहाण

केईएममध्ये कर्मचाऱ्याला सुरक्षारक्षकाडून मारहाण

Subscribe

रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र आज केईएम रुग्णालयामध्ये सुरक्षारक्षकांनीच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पालिका किंवा सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार नवीन नाहीत. असाच प्रकार पुन्हा एकदा केईएम रुग्णालयामध्ये घडला आहे. सलग दुसऱ्या दिवशी केईएम रुग्णालयामधील कर्मचार्‍याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. गुरुवारी सायंकाळी केईएम रुग्णालयामधील कर्मचारी विजय शंकर नाटेकर ड्युटी संपल्यावर नातेवाईकाला घेऊन आपातकालीन विभागात जात होते. त्यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बल जवानाकडून त्यांना विचारणा केली. पण, आपण कर्मचारी असल्याचे नाटेकर यांनी सांगितले. त्यावरुन नाटेकर आणि जवान यांच्यात बाचाबाची होत धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे.

दोन दिवसातील दुसरी घटना

तर, दुसरी घटना शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे. वॉर्डमध्ये मोबाईल चार्जिंग लावण्यास मनाई केल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकाने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा हा दुसरा प्रसंग असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

केईएम रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा संप

सुरक्षाजवानांकडून झालेल्या धक्काबुक्की आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्मचार्‍यांनी संप पुकारला. मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करेपर्यंत काम बंद ठेवण्याची भूमिका या कर्मचारी संघटनांनी घेतली होती.

काम बंद ठेवण्याचा इशारा

केईएम रुग्णालयामध्ये दरदिवशी येणार्‍या रुग्णांची संख्या आणि त्यासाठी उपलब्ध असणारे अपुरे मनुष्यबळ याबद्दल नेहमीच तक्रार केली जाते. यावर सतत दुर्लक्ष केले जाते, असा आरोप कामगारांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हॉस्पिटलच्या कर्मचार्‍याला होणार्‍या मारहाणीचा प्रकार घडत असल्याने अखेर शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. कर्मचार्‍यांनी रुग्णालयाच्या डीन कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. मारहाण करणार्‍या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला.

- Advertisement -

सात जणांविरोधात एफआयआर दाखल

या घटनेनंतर अधिष्ठातांसह बैठक झाली. अधिष्ठातांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत असल्याचं आणि कर्मचाऱ्याच्या कॉलरला धरुन जाब विचारत असल्याचं पाहिलं. संबंधित सात जणांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच दोषींना कामावरुन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणावर ४ दिवसांत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी युनियनकडून करण्यात आली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काही तासांसाठी कामबंद आंदोलन केलं होतं. सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या विचारात घेऊन त्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.  – डॉ. हेमंत देशमुख, केईएमचे अधिष्ठाता


वाचा – रुग्णाच्या सोयीसाठी केईएम बदलणार ओपीडीची वेळ

वाचा – केईएमच्या निवासी डॉक्टरांनी फळे विकून केले आंदोलन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -