घरCORONA UPDATEसंक्रमित कोरोना योद्ध्यांसाठी केईएम मार्डचे टास्क फोर्स 

संक्रमित कोरोना योद्ध्यांसाठी केईएम मार्डचे टास्क फोर्स 

Subscribe

केईएम हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या केईएम मार्डने 'केईएम मार्ड कोविड १९ टास्क फोर्स' हा अभिनव उपक्रम हाती घेतला.

कोविड रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू लागले. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी केईएम हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या केईएम मार्डने ‘केईएम मार्ड कोविड १९ टास्क फोर्स’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला. संक्रमित झालेल्या कोरोना योद्ध्यांना ‘कोविड मित्र’ बनून मानसिक आधार देत त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे, विलगीकरण केंद्रात त्यांची काळजी घेणे अशी महत्वपूर्ण कामगिरी या उपक्रमांतर्गत टास्क फोर्सने पार पाडली. त्यामुळेच या अभिनव उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता हा उपक्रम राज्यातील सर्व वैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये राबवण्याचा विचार मार्डकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका हा कोरोना योद्ध्यांना बसू लागल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु कोरोना रुग्णांसाठी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत होती. त्यामुळे या कोरोना योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, उपचार करणे, त्यांना मानसिक आधार देणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार उपलब्ध करणे, निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, त्यांच्या रिपोर्टपासून सुट्टीचा अर्ज करेपर्यंत सर्व बाबींची काळजी घेण्यासाठी केईएम हॉस्पिटलमधील मार्डने ‘केईएम मार्ड १९ टास्क फोर्स’ स्थापन केला होता. केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये क्वारंटाईन आणि वाहतूक समिती, आयसोलेशन अँड मेडिकल केअर, पीपीई, अन्न, हॉस्टेल, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, ह्युमन रिसोर्सेस फॉर ज्युनिअर डॉक्टर, पेशंट वेल्फेअर, इन्फॉर्मशन अँड अपडेट, डिपार्टमेंटल रेप्रेझेन्टेशन अशा १० विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

फोर्समध्ये ५० हुन अधिक डॉक्टरांची टीम वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. समित्यांमध्ये नियुक्त निवासी डॉक्टरांनी आपापली कामगिरी चोख बजावल्याने कोरोना संक्रमित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना किट, सॅनिटायझर , अन्नाची पाकिटे यासारख्या गोष्टींचा पुरवठा झाला. परिचारिका आणि कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेतल्याने त्यांच्यामधील संक्रमणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून निवासी डॉक्टरांची सर्व काळजी घेत त्यांना घरच्यांची कमतरता जाणवू दिली नाही. यामुळे ते लवकर बरे होऊन कामावर रुजू झाले. टास्क फोर्सला मिळालेले यश पाहता केईएम मार्डने हा उपक्रम राज्यातील सर्व वैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये राबवण्यात यावा असा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) सादर केला.

‘केईएम मार्ड कोविड १९ टास्क’मुळे कोरोना योद्ध्यांना चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे हा अभिनव उपक्रम राज्यातील सर्व वैद्यकीय कॉलेजमध्ये सुरु करण्याचा प्रस्ताव आम्ही डीएमईआरला सादर केला आहे. याबाबत ते सकारात्मक असून, मान्यता मिळाल्यास हा उपक्रम सर्व राज्यात सुरु करण्यात येईल. 
– डॉ. दीपक मुंढे,‌ अध्यक्ष, केईएम मार्ड

केईएमच्या अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या उपक्रमामध्ये ५० हुन अधिक डॉक्टर रुग्णसेवा बजावत आहेत. हॉस्पिटलमधील प्राध्यापकांकडूनही मोलाचे सहकार्य मिळत आहे. 
– डॉ. कौस्तुभ दासगुप्ता, समन्वयक, केईएम मार्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -