चिखल फासलेल्या नंबर प्लेटने अपहरणकर्ते फसले

मुळशीच्या व्यक्तीचे २५ लाखांसाठी अपहरण

abducted

कारच्या नंबर प्लेटला लागलेला चिखल पोलिसी नजरेत आल्याने अपहरणाचा मोठा डाव उघडकीस आल्याची घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी वामन मारुती शिंदे (वय३९), योगेंद्र प्रसाद (वय२५), दिलीप सत्तन पासवान (वय३२), धुरपचंद्र यादव (वय३३), संदीप प्रकाश सोनावणे (वय३५) (सर्व राहणार अंबरनाथ) या अपहरणकर्त्यांना कोठडीत बसण्याची पाळी आली आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेला दिगंबर इंदलसिंग चितोडिया(मुळशी पुणे) याची सुखरूप सुटका झाली आहे. गुरूवार ३० सप्टेंबर रोजी रात्री खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर व पोलीस अंमलदार स्वागत तांबे आणि राम मासाळ हे शिळफाटा येथे गस्त घालत होते. त्याच दरम्यान एमएच ०४ सीटी २५९७ क्रमांकाची अल्टो कार जात असताना कारच्या नंबर प्लेटवर चिखल लावला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांना संशय आला. कारमध्ये सहा इसम बसले होते. कार थांबवून चौकशी केली असता कारमधील पाच इसम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्याचवेळी घाबरलेल्या एकाने पोलीस अधिकार्‍यांना ‘मला वाचवा’ अशी विनंती केली असता पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असता यातील पाच जणांनी दिगंबर चितोडीया याचे अपहरण केल्याचे उघड झाले.

अपहरण करून अंबरनाथ येथे दोन दिवस डांबून ठेवून त्याच्या कुटुंबाकडे २५लाख खंडणीची मागणी केली असल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली. खोपोली पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर याबाबत पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाणे अपहरण व खंडणी मागणे असा गुन्हा अज्ञात आरोपींविरोधात दाखल झाल्याचे समजले. खंडणी आणि जीवितहानी न होता दिगंबर इंदलसिंग चितोडिया (मुळशी पुणे) याची सुटका करणार्‍या खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस अंमलदार राम मासाळ, स्वागत तांबे यांचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी अभिनंदन केले .