घरमुंबईधक्कादायक! ट्रॅफिकमुळे महिलांमध्ये वाढतोय किडनीचा विकार

धक्कादायक! ट्रॅफिकमुळे महिलांमध्ये वाढतोय किडनीचा विकार

Subscribe

वाहतूक कोंडीमुळे महिलांमध्ये मूत्रपिंडाचा त्रास उद्भवत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. या सर्वेक्षणात महिलांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित आजारांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील वाहतूक समस्या ही सर्वश्रूत आहे. एकेकाळी शिस्तबद्ध सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई शहरात वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी ही महिलांच्या आरोग्यासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक कोडींमुळे बसमधून अथवा रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्य समस्यांमध्ये वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, या दहा वर्षात मुंबईतील बस गाड्यांचा धावण्याचा वेग निम्म्याने कमी झाला आहे. गेल्या दशकात बस गाड्या धावण्याचा वेग हा १६ किमी/तास इतका होता. आता हा वेग ९ किमी/तास असा झाला आहे. ही परिस्थिती गर्दीच्या वेळी नक्कीच अजून गंभीर होत असेल म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी ६ ते ७ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.

‘या’ हॉस्पिटलने केले सर्वेक्षण

बोरीवलीतील अपेक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलतर्फे महिला दिनानिमीत्त एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात वर्किंग वूमन म्हणजेच काम करत असलेल्या महिलांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित आजारांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणामध्ये गेल्या सहा महिन्यात २०० महिलांशी संपर्क साधला असता वाहतूक कोंडीमुळे कामावरून निघाल्यावर ते घरी पोहचेपर्यंत लागणाऱ्या वेळेत एक ते दीड तासांची वाढ होते आणि या वेळेमध्ये सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक महिलांना मूत्रसंसर्गाचे आजार होत आहेत.

मूत्रपिंडात लघवी साचणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मूत्र साठवण्याची पिशवी (ब्लॅडर ) भरली की लघवीची जाणीव होते आणि वैद्यकीय दृष्टया लघवीची जाणीव झाल्यावर पुढील १० ते १५ मिनिटांत ती विसर्जित होणे आवश्यक असते. पण, लघवी जास्त वेळ रोखून धरल्यामुळे महिलांमध्ये मूत्रविकारांमध्ये वाढ झाली आहे.
– डॉ. अदिती अग्रवाल, स्त्रीरोगतज्ञ, अपेक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल
- Advertisement -

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये वाढ

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच मूत्रमार्गात संसर्ग होण्याच्या घटनेत मार्च ते मे महिन्यात वाढ होते. शरीरातल्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये प्रत्येक मिनिटाला बाराशे मिलीलिटर रक्त शुद्ध होण्यासाठी येत असते. मूत्रपिंडात अतिशय गुंतागुंतीच्या रक्तशुद्धीकरणाच्या प्रक्रियेद्वारे झालेल्या सफाईनंतर निर्माण झालेले मूत्र मूत्रवाहिनीद्वारे मूत्राशयात जाते आणि हे मूत्र जर वेळीच शरीराच्या बाहेर फेकले गेले नाही तर लघवीत असलेल्या युरिया आणि अमिनो अॅसीडमुळे अनेक जंतू विकसित होतात आणि ते मूत्रपिंडाचे आरोग्य बिघडवतात.

मानवी शरीरातून टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे मुख्य काम मूत्रसंस्था (किडनी) करते, मूत्रपिंडात असलेल्या असंख्य सूक्ष्म गाळण्यांमधून पाणी आणि टाकाऊ घटक गाळल्यानंतर शरीरात मूत्राची निर्मिती होते. वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू राहत असल्याने अंदाजे वयाच्या तिशी-चाळीशीनंतर नैसर्गिकरित्या किडनीचे कार्य मंदावते. तिशीनंतर दर दहा वर्षांनी किडनीचे कार्य दहा टक्‍क्‍यांनी मंदावत जाते. पण, त्या आधीच्या टप्प्यातच किडनीवर अतिरिक्त ताण दिला जात असेल, तर किडनी विकार लवकर बळावण्याची दाट शक्‍यता असते.
– डॉ. महेश प्रसाद, किडनी विकारतज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरारोड

चाळीशीत बळावतात किडनीचे विकार

मॉलमध्ये शॉपिंग करताना, प्रवासात तसेच कामाच्या ठिकाणी अनेक तरुण महिलांमध्ये पुरुषांपेक्षा लघवी रोखण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, वयाच्या चाळीशीत आल्यावर अनेक महिलांना किडनी आणि मूत्रसंसर्गाचे आजार नियमितपणे आढळतात. त्यासोबतच दर दोन तासांनी मूत्रविसर्जन करणे गरजेचे असून मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्‍यक आहे, हे प्रत्येक महिलेने लक्षात घेतले पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -