‘KK च्या हृदयात होते ब्लॉकेज, अतिउत्साहामुळे हृदय ठप्प, CPR मुळे वाचले असते प्राण, डॉक्टरांचा खुलासा

जर केके यांना तातडीने सीपीआर देण्यात आला असता तर त्यांचे प्राण वाचले असते असा खुलासा डॉक्टरांनी केला आहे.

सुप्रसिद्ध गायक के के यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पण जर केके यांना तातडीने सीपीआर देण्यात आला असता तर त्यांचे प्राण वाचले असते असा खुलासा डॉक्टरांनी केला आहे.

केके यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या धमनीमध्ये बरेच ब्लॉकेज आढळले आहेत. तसेच इतर धमन्या आणि रक्तवाहीन्यांमध्ये अनेक ठिकाणी ८० टक्के ब्लॉकेज आढळल्याने डॉक्टरही चक्रावले आहेत. कारण लाईव्ह परफॉर्मन्स करताना केके खूप उत्साहात होते. त्याच अतिउत्साहामुळे त्यांच्या धमन्यांमधून हृदयाला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबला. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पण त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता जर त्यांना सीपीआर (cardiopulmonary resuscitation)देण्यात आला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते . विशेष म्हणजे केकेला हृदयाशी संबंधित आजार अनेक दिवसांपासून होता. पण त्यांना हे माहितच नव्हते. स्टेजवर गाणे गाताना केके खूप उत्साहात होते. ते चालतं चालतं गाण गात होते. मध्येच डान्सही करत होते. यामुळे त्यांच्या हृदयावर ताण आला आणि हृदयातील रक्तपुरवठा बंद पडला. यामुळे काही काळासाठी त्यांचे हृदयाचे ठोकेही मंदावले आणि ते बेशु्ध्द पडले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पण त्यांना सीपीआर दिला असता तर हृदयाला रक्तपुरवठा मिळाला असता आणि हृदय नक्कीच सुरू झाले असते. असे केकेच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान केके काही दिवसांपासून अँटासिंड्स गोळ्या घेत होते. पचनाविषयी समस्या असल्याचे त्यांना वाटत होते. पण खरं तर त्यांना हृदयाशी संबंधित तक्रारी होत्या. तसेच केके यांच्या पत्नीने केकेचा फोन आल्याचे सांगितले असून खांदा आणि हात दुखत असल्याचे त्यांनी तिला सांगितले होते. पण त्या वेदना या हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असल्याचे मात्र कोणालाच समजले नाही.