HomeमुंबईKurla Bus Accident : प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी माझा बळी, कुर्ला अपघातातील बसचालक...

Kurla Bus Accident : प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी माझा बळी, कुर्ला अपघातातील बसचालक संजय मोरेचा आरोप

Subscribe

डिसेंबर महिन्यात 09 तारखेला रात्री 9.30 वाजताच्या सुमारास कुर्ला येथील एलबीएस मार्गावर मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला. भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बसमुळे 08 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

मुंबई : डिसेंबर महिन्यात 09 तारखेला रात्री 9.30 वाजताच्या सुमारास कुर्ला येथील एलबीएस मार्गावर मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला. कुर्ला (प.) रेल्वे स्थानक येथून निघालेली 332 क्रमांकाची बस ही अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली होती. परंतु, ही बस एलबीएस मार्गावर आल्यानंतर चालक संजय मोरे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर साधारणतः 300 ते 400 मीटर अंतरामध्ये 50 पेक्षा अधिक वाहनांना आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. या घटनेत एकूण आठ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. पण या घटनेतील आरोपी बसचालक संजय मोरे याने न्यायालयात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली. या अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपींना वाचविण्यासाठी आपला बळी दिला जात आहे. या दुर्घटनेसाठी मला एकट्याला जबाबदार धरता येणार नाही, असा दावा चालक संजय मोरे याने केला आहे. (Kurla Best Bus Accident driver Sanjay More alleges that he is sacrificing himself to save the main accused)

कुर्ला अपघातातील आरोपी बेस्ट बस चालक संजय मोरे याने गेल्या आठवड्यात जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी त्याच्या वतीने आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा केला. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांच्यासमोर मोरे याच्या जामीन अर्जावर गुरुवारी (ता. 02 जानेवारी) सुनावणी पार पडली. पोलिसांच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रभाकर तरंगे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून मोरे याला जामीन देण्यास विरोध केला. ज्यानंतर आरोपी चालक याने वकील समाधान सुलाने यांच्यामार्फत जामीन अर्ज कोर्टात सादर करत आपली बाजू मांडली. आपल्याला 1989 पालून बस चालविण्याचा अनुभव आहे. पण त्यादिवशी इलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्याचमुळे हा अपघात झाल्याची माहिती संजय मोरेच्या वकीलांनी मांडली आहे.

हेही वाचा… Dharavi Accident : धारावीत अवाढव्य ट्रेलरची गाड्यांना धडक, वाहने गेली मिठी नदीपात्रात

इलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्याचमुळे हा अपघात झाला. म्हणून या अपघातासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. उलट या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जातोय, असा गंभीर स्वरुपाचा दावा संजय मोरेने केला आहे. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आली नाही, आरोपीही करण्यात आलेले नाही. आपल्याला बेस्टमधून वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले आणि दिंडोशी बस आगारात इलेक्ट्रिक बस चालवण्यास सांगितलेले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला इथे बस चालवण्यास परवानगी देण्यात आली, त्यामुळे या दुर्घटनेसाठी मला एकट्याला जबाबदार धरता येणार नाही, असा पुनरूच्चार संजय मोरेने आपल्या जामीन अर्जातून केला आहे.