मुंबईच्या पूर आपत्ती व्यवस्थापनात उणिवा

कॅगचा मुंबई महापालिकेच्या कारभारावर ठपका

CAG

मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापनातील ढिसाळपणा भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालातून उघड झाला आहे. मुंबईत तुंबणार्‍या पाण्याला मुंबई महानगरपालिकेच्या पूर आपत्ती व्यवस्थापनात महत्वाच्या उणिवा कारणीभूत असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात पूर सज्जता मार्गदर्शक तत्त्वानुसार पूर आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी आढळल्या आहेत. सध्याची महापालिकेची यंत्रणा प्रचंड गाळाने भरलेली आहे असे प्रथमदर्शनी मत कगने नोंदवले आहे. भरती आणि ओहोटीचा परिणाम गटारांवर झालेला आहे. ४५ विसर्गनलिकांपैकी केवळ तीन ठिकाणी पूराच्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजे आहेत. सध्याची २५ मिमी इतकीच पावसासाठीच्या गटारांची क्षमता आहे. सुमार कामगिरीमुळे व सेवा पुरवठादारांकडून निकामी झालेल्या नलिकांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचेही कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सुमार संरचनात्मक परिस्थिती, छोटे नाले अयोग्य ठिकाणी असणे व प्रभावी नसणे यासारख्या नोंदीही कॅगने नोंदवल्या आहेत.

महापालिकेच्या पर्जन्यजल नि:स्सारण विभागाच्या मते बॉक्स ड्रेनच्या पुनर्वसनाची गरज नव्हती असे मत नोंदवण्यात आले आहे. एप्रिल २०१८ पर्यंत सल्लागाराने ब्रिमस्टोवॅड अद्ययावत केल्याचा बृहत आराखडा सादर केला नव्हता. त्यामुळे ब्रिमस्टोवॅड अद्ययावत करण्यास सहा वर्षांचा विलंब झाला, असे कॅगच्या निदर्शनास आले आहे.मुंबई महापालिकेने पूर आपत्ती व्यवस्थापनाच्या निमित्ताने केलेल्या कारवाईत २५ नाले ५० मिमी प्रतितास क्षमतेचे सुधारीत केले. तर १२ नाल्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. चार नाल्यांची कामे येत्या दिवसात करण्यात येतील. तर महापालिकेने काही नाले याआधीच बंद केले आहेत.