घरCORONA UPDATEधक्कादायक! रुग्णवाहिकेअभावी कोरोना रूग्णाने चालत रूग्णालय गाठलं

धक्कादायक! रुग्णवाहिकेअभावी कोरोना रूग्णाने चालत रूग्णालय गाठलं

Subscribe

कोरोनाबाधित रूग्णाने स्थानिक कार्यकत्यांच्या मदतीने दुपारच्या भर उन्हात २ किमी चालत पालिकेचं रूग्णालय गाठलं.

एकीकडे कल्याण-डोंबिवली शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच, दुसरीकडे मात्र डोंबिवलीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ३० वर्षीय तरूणाची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली असतानाही पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयाकडून त्या रूग्णाला घरून हॉस्पीटलमध्ये पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे अखेर त्या कोरोनाबाधित रूग्णाने स्थानिक कार्यकत्यांच्या मदतीने दुपारच्या भर उन्हात २ किमी चालत पालिकेचं रूग्णालय गाठलं. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वचजण जीव तोडून काम करीत असतानाच असा प्रकार घडल्याने सर्वत्रच तीव्र संताप व्यक्त होत आहे.

डोंबिवली पश्चिमेत राहणारा ३० वर्षीय तरूण हा वाडीया रुग्णालयामध्ये नोकरीला आहे, बुधवारी संध्याकाळी त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे शास्त्रीनगर रूग्णालयाकडून त्याला सांगण्यात आले. घरी रुग्णवाहिका पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. रुग्णालयात सातत्याने फोन केल्यानंतर त्याला रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णालयामध्ये चालत येण्याचे सांगण्यात आले. हा प्रकार त्यांनी स्थानिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे यांना सांगितला. त्यांनीही रूग्णालय प्रशासनाशी फोनवरून संपर्क साधला, मात्र त्यांनाही रूग्ण्वाहिका उपलब्ध नसल्याने रूग्णालयात चालत येण्यास सांगितले. अखेर स्थानिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे, संदीप सामंत,  गणेश पाटील, मनोज वैद्य, राजा चव्हाण, युगेश भोईर यांनी जीवाची पर्वा न करता, त्या रूग्णाला भर दुपारी रस्त्याने चालत रूग्णालयात नेले. त्यावेळी सोशल डिस्टन्स पाळण्यात आले.  तसेच रस्त्यावरील लोकांनाही आजूबाजूला करीत त्याला पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेले.

- Advertisement -

कोरोना रूग्ण तब्बल तीन तास बाकडयावर बसून 

 कोरोनाबाधित रूग्ण हा भर उन्हात चालत रूग्णालयात जात असल्याने त्याला चक्कर येऊ नये किंवा त्याचा संसर्ग इतरांना होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या मागाहून चालत त्या रूग्णाला पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात पर्यंत नेले. साधारण २ किमी पायपीट करीत दुपारी १२ वाजता शास्त्रीनगर रूग्णालयात पोहचला, तेथून करोनाबाधित रूग्णाला भिवंडी कोन गाव येथील टाटा आमंत्रा या हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाते. मात्र शास्त्रीनगर रूग्णालयातून टाटा आमंत्रा हॉस्पीटलपर्यंत नेण्यासाठीही रुग्णवाहिका येण्यासाठी तब्बल तीन तास लागले. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत करोनाबाधित रूग्ण हा शास्त्रीनगर रूग्णालयात एका बाकडयावर बसून होता. त्या रूग्णाच्या जेवणाची सोय नव्हती. त्यामुळे करोनाबाधित रूग्णांचे हाल होत आहेत अशी नाराजी सामाजिक कार्यकर्ते  संदीप सामंत यांनी व्यक्त केली.

कोरोनाबाधित रूग्णाला नेण्यासाठी महापालिकेकडे रुग्णवाहिका नाही हे खेदाची बाब आहे.  रूग्णालय प्रशासनाला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले तुम्ही चालत या.  करोनाबाधित रूग्णाला चालत नेणे योग्य आहे का? मात्र रुग्णवाहिका अभावी चालत जावे लागते हे खेदाची बाब आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. दुस-या रूग्णावर ही वेळ येऊन येणे यासाठी पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
– बाळा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते

प्रशासन म्हणते, गैरसमज झाला

कोरोना पेशंटला चालत आणणं योग्य नाहीच, रूग्णालयाकडून नेहमीच रुग्णवाहिका पाठवली जाते. मात्र आजचा प्रकार गैरसमजूतीतून घडला आहे. कोरोना पेशंट विषयी बोलत होते हे आम्हाला माहित नव्हत. आम्हाला वाटलं विलगीकरण कक्षाविषयी बोलत आहेत, म्हणून चालत या असे सांगितले. एकमेकांच्या ऐकण्यात आणि बोलण्यात गैरसमज झाला आहे, असे शास्त्रीनगर रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -