मुंबईतील एका फ्लॅटमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह, मुलीवर संशय

मुंबईतील लालबाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Old Woman Dead Body

मुंबईतील लालबाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका फ्लॅटमधून ५३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत सापडला होता. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलीला ताब्यात घेतलं आहे.

मुंबईत मंगळवारच्या मध्यरात्री पोलिसांना एका बेपत्ता महिलेचा कुजलेला मृतदेह तिच्या घरी प्लास्टिकच्या पिशवीत सापडला. यानंतर महिलेच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. मृताचे वय ५० ते ५५ वर्षांच्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मार्चुरी येथे पाठवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच महिलेच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

काल रात्री उशिरा एका घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या घराची पाहणी केली. कपाट तपासलं असता, त्यामध्ये प्लास्टिकची एक मोठी पिशवी आढळली. या पिशवीमध्ये एका ५० -५५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले फ्लॅट सील करण्यात आला. याप्रकरणी पोलीस मृत महिलेच्या मुलीची चौकशी करत आहेत. मुलीनेच खून करून मृतदेह पॅक करून कपाटात लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, पोलिसांनी हत्येचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.