दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे भुस्खलन; मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग

दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे भुस्खलन झाले आहे. गुरूवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्यरात्री पेडर रोड येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ भूस्खलन झाले.

Mumbai Land Slide

दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे भुस्खलन झाले आहे. गुरूवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्यरात्री पेडर रोड येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ भूस्खलन झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (landslides at Pedder road in south mumbai due to heavy rain)

भूस्खलनामुळे डोंगरावरील झाडे ढिगाऱ्याबरोबर खाली सरकली आहेत. त्यामुळे फूटपाथलाही तडा गेला. भूस्खलनामुळे स्नेह सदन आणि प्रभू कुंजच्या आजूबाजूचा परिसरही बाधित झाला आहे. महापालिकेने स्ट्रक्चरल कन्सल्टंट आणि भूगर्भशास्त्रज्ञ यांना जागेची परिस्थिती पाहण्यासाठी बोलावले आहे.

मुंबईच्या सखल भागांत पावसाचे पाणी साचले

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागांत पावसाचे पाणी साचले आहे. दक्षिण मुंबई अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने जोर पकडला असला तरी सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला या सेक्शन या भागातील ट्रेन सुरू आहेत.

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गासह इतर रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आणि मुंबईकरांचा ठिकठिकाणी गाड्यांमध्येच खोळंबा झाला.

शुक्रवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे ५१.२ मिमी, तर कुलाब्यात २८.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, ठाण्यात ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तसेच काही घरांचीही पडझड झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने दादर-हिंदमाता, अंधेरी सब वे आदी अनेक परिसरांत पाणी भरले.

पावसाचे पाणी साचल्याने बेस्टच्या ८ बसगाड्यांचे मार्ग बदलले

मुंबईत बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शुक्रवारी रात्रीपर्यंत कायम राहिला. त्यामुळे हिंदमाता, सायन रोड २४, अंधेरी सब वे आदी सखल भागात पाणी कमी – अधिक प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे बेस्ट परिवहन विभागाच्या बसगडयांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे नाईलाजाने बेस्टने आपल्या ८ बस गाड्यांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली. त्याचा बेस्टच्या प्रवाशांना काही प्रमाणात त्रास झाला.


हेही वाचा – मुंबईत पुढील ५ दिवस ‘मुसळधार’; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी