जुहू चौपाटीवर मुंबईकरांच्या गर्दीचा महासागर

large crowds of mumbaikars at juhu beach mumbai on sunday
जुहू चौपाटीवर मुंबईकरांच्या गर्दीचा महासागर

मुंबई -: गेल्या मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे व निर्बंधांमुळे घराबाहेर फिरायला न मिळालेल्या मुंबईकरांनी कोविडचा प्रभाव कमी झाल्याने रविवारी मुंबईतील जुहू चौपाटीवर गर्दी केली होती. बच्चे कंपनी, महिला, तरुण वर्ग समुद्रातील भरतीच्या हलक्या लाटांसोबत स्वतःला झोकून देत अंघोळीचा, पोहण्याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे दिसून येते.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शासन व पालिका प्रशासन यांनी कोविडला रोखण्यासाठी काही कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर कामाशिवाय जाणे – येणे कठीण झाले होते. त्यावेळी मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोविडची ओळख नसल्याने मुंबईत कोविडला नियंत्रणात आणणे कठीण झाले होते.

त्यातच मुंबईत कोविडची पहिली, दुसरी व तिसरी लाटही एका पाठोपाठ एक धडकत राहिल्याने मुंबईकरांना घरातून फक्त कामाशिवाय बाहेर जाण्याव्यतिरिक्त इतरत्र फिरायला वगैरे जाण्यास उसंतच मिळाली नाही . पहिल्या लाटेनंतर थोड्या कालावधीसाठी निर्बंध शिथिल झाले की पुन्हा काही व्यक्तींच्या हलगर्जीपणामुळे कोविडचा प्रादुर्भाव वाढून कोविडची दुसरी लाट कधी धडकत असे ते मुंबईकरांना कळतच नव्हते.

मात्र आता कोविडबाधित रुग्णांची संख्या घटल्याने व तिसरी लाटही नियंत्रणात आल्याने मुंबईकरांनी होळी व रंगपंचमीची कसर यंदा भरून काढली. त्याप्रमाणेच आता मुंबईकर आपल्या कुटुंबीयांसह जरा कुठे घराबाहेर पडू लागला आहे. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी राणीच्या बागेत, गेट वे ऑफ इंडिया व जुहू, गिरगाव, दादर, माहिम चौपाटीवर मुंबईकर कुटुंबीयांसह गर्दी करताना व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहे.

जुहू चौपाटी परिसरात तर वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे. परिणामी बेस्टच्या बसगाड्या जुहू बस आगार या ठिकाणी काहीशा विलंबाने पोहोचत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे चौपाटीवर संध्याकाळच्या सुमारास एवढी गर्दी होते की, या गर्दीत लहान मुलांची चुकमुक होत असल्याच्या घटना घडत आहेत. पालकांना नाईलाजाने आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी चौपाटीवरील पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागत आहे.