घरमुंबईसांडपाण्यावर पिकवलेल्या पालेभाज्या जीवघेण्या

सांडपाण्यावर पिकवलेल्या पालेभाज्या जीवघेण्या

Subscribe

शासनाने घातक रासायनिक खाते आणि कीटकनाशकांवर तातडीने बंदी आणायला हवी, अशी मागणी कॉस्मिक इकोलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फाउंडेशनच्या 'विषयुक्त अन्न विरोधी जागर' मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी करण्यात आली आहे.

केवळ पोट भरणे हा अन्नाचा उद्देश नसून, त्यातून शरीराचे पोषण व्हायला हवे. पण सध्या आपण जे खातो ते शरीरात विकार-विकृती उत्पन्न करणारे आहे. यासाठी शासनाने घातक रासायनिक खाते आणि कीटकनाशकांवर तातडीने बंदी आणायला हवी, अशी मागणी कॉस्मिक इकोलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फाउंडेशनच्या ‘विषयुक्त अन्न विरोधी जागर’ मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी करण्यात आली. या मागणीच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहिमेला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला.

शेतीत अन्न कमी तर विषच जास्त

हरित क्रांतीच्या नावाखाली रासायनिक शेतीची सुरवात झाली. यामुळे शेतमालाचे उत्पन्न वाढलेले दिसत असले तरी प्रत्यक्षात उत्पादन खर्च वाढत गेल्याने शेतकरी नागवला गेला. अलीकडे तर संकरित बियाणे आणि रासायनिक खाते-कीटकनाशके वापरल्याशिवाय हातात काही पडत नाही. रसायनांच्या माऱ्यामुळे जमिनीचा पोतच बिघडलाय. शिवाय इतका खर्च करून जे उत्पादन येते ते अन्न कमी आणि विषच अधिक असते, अशी चिंता कॉस्मिक इकोलॉजिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

अश्या भाज्या खाल्याने अपमृत्यूकडे वाट

आहारतज्ज्ञ म्हणतात की, आहारात भरपूर पालेभाज्या असाव्यात. पण आपण खातो त्या पालेभाज्या खरेच आरोग्यदायी आहेत का? शहरात सर्रास रेल्वे रुळांशेजारी पालेभाज्या लावल्या जातात. अर्थात यासाठी पाणी वापरतात ते रुळांशेजारील गटारातून. या नाल्यांमधील पाण्यात मोठ्या प्रमाणात शिसे, आर्सेनिक, पारा यांसारख्या जाड धातूंचे कण असतात. हे कण पाण्यातून भाज्यांत आणि तिथून आपल्या पोटात जातात. यामुळेच अलीकडे किडनी, मेंदू आणि मज्जासंस्थेचे विकार वाढले आहेत. दीर्घकाळ अशा भाज्यांचे सेवन निश्चित अपमृत्यूकडे घेऊन जाणारे आहे. निरोगी जगायचे असेल तर या भाज्या आपण टाळायलाच हव्यात, असा सल्ला मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध लेखिका सृष्टी गुजराथी यांनी दिला आहे.

घरच्या घरी ‘वृक्षामृत’ बनवा

सरकार बंदी आणेल याची वाट बघत बसू नका. स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच काही पर्याय उभे करा. बाजारातील पालेभाज्या खाण्यापेक्षा घरच्या घरी भाज्यांची छोटी छोटी रोपे तयार करा. बाजारातील भाजी रोज तीनदा खाऊनही मिळणार नाही, इतकी जीवनसत्त्वे अशा भाज्या आठवड्यातून फक्त तीन-चारदा खाऊनही तुम्हाला मिळतील. शिवाय हिरवाईच्या सहवासाने नैराश्यासारखे मनोविकारही दूर पळतील. फक्त या भाज्या रुजवताना कोणतेही विकतचे खत वापरू नका. घरच्या घरी ‘वृक्षामृत’ बनवा. संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने रोपे वाढवा, असा सल्लाही ट्रस्टचे सचिव सुधीर इनामदार यांनी दिला.

- Advertisement -

मान्यवर उपस्थित

डॉ. तुकाराम सावदेकर यावेळी यांनी वृक्षामृत कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दिले. सुरेखा अभ्यंकर यांनी उपस्थितांना वृक्षामृताचा वापर आणि फायदे उपस्थितांना समजावून सांगितले. विश्वास ठेवण्याआधी, प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी शेकडो लीटर वृक्षामृताचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी ब्रँड कन्सल्टन्ट सुनील देवरुखकर, राधाकृष्ण गायतोंडे, सुरेखा अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -