मुलुंड जकात नाक्याजवळील जलवाहिनीची गळती १५ तास अगोदरच दुरुस्त

पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु असताना, मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील मुंबई महापालिकेची २,३४५ मिलीमीटर व्यासाची ‘मुंबई –२’ जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु असताना, मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील मुंबई महापालिकेची २,३४५ मिलीमीटर व्यासाची ‘मुंबई –२’ जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या कामामुळे पालिकेच्या शहर आणि पूर्व उपनगरातील भागात ४८ तासांसाठी १५ टक्के पाणी कपात करण्यात आली होती. (Leakage of water channel near Mulund jakat naka repaired 15 hours in advance)

या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम २७ मार्चपासून युद्धपातळीवर सलग ३६ तास करण्यात आले. त्यामुळे हे काम नियोजित वेळेच्या १५ तास अगोदरच म्हणजे बुधवारी पहाटे ५ वाजता आटोपले. त्यामुळे मुंबईकरांचा पाणी पुरवठा लवकर सुरळीत होऊन मोठा दिलासा मिळाला. पालिका आयुक्त इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या आदेशाने सदर काम विक्रमी वेळेत व मुदतीपूर्वीच करण्यात आले. त्यामुळे पालिका जल अभियंता खात्याचे अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबईतील नागरिकांनी केलेल्या सहकार्यासाठी जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.

पालिकेने या कामासाठी परिरक्षण विभाग,नगर बाह्य विभाग आणि आपत्कालीन विभागाचा चमू तैनात केला होता. पालिका जल अभियंता खात्याचे १२ अभियंता आणि ३० कर्मचाऱयांच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले. सलग ३६ तास दिवसरात्र हे जलवाहिनी दुरूस्तीचे काम चालले. या कामात पाण्याचा प्रेशर असतानाही काम करण्याचे आव्हान होते. जलवाहिनीतून गळती झालेल्या पाण्यातच हे दुरूस्तीचे काम चालले. अखेर आज पहाटे ५ वाजता हे काम पूर्ण करण्यात जल अभियंता विभागाला यश आले. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठीची सुरूवात झाली आहे.


हेही वाचा – आम्ही वाट पाहतोय… 2024मधील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नितीश कुमारांनी दिले संकेत