2019 मध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेली या गोष्टीला पाच वर्षे झाली. यानंतर शिवसेनेत फूट आणि महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं, हा इतिहास सर्वांना माहितच आहे. मात्र, पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं होतं. हेच यश विधानसभा निवडणुकीत मिळालं नाही. एकप्रकारे लोकसभेला महाविकास आघाडीत घटकपक्षांमध्ये झालेल्या मतांची विभागणी विधानसभेला झाली नाही, असा नाराजीचा सूर ठाकरेंच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची मंगळवारी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. यावेळी सर्व उमेदवारांकडून पराभवाची कारणे उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली. तेव्हा, उमेदवारांनी ईव्हीएमसह मित्रपक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल एका मराठी वृत्तपत्रानं वृत्त दिलं आहे.
हेही वाचा : भाजपच्या ‘त्या’ ऑफर्सवर शिंदेंनी टाकली गुगली, वरिष्ठ नेतृत्त्व पेचात; कसा मार्ग काढणार?
काही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपले काम केले नाही. हिंदुत्त्ववादी विचारांपासून दूर गेल्याची टीका लोक करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी मागणी बहुतांशी उमेदवारांनी केली. त्यावर मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा, तो नंतर ठरवू, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अनेक ठिकाणी आम्ही मतदान करवून घेतले. पण, ते ‘ईव्हीएम’मध्ये उमटले नाही, असा सवालही अनेक उमेदवारांनी उपस्थित केला. त्यावर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक मतदारसंघात 5 टक्के ‘ईव्हीएम’मधील मतांची तपासणी करता येते. त्यामुळे सर्व उमेदवारांनी शुल्क भरून आपापल्या मतदारसंघातील फेरमतमोजणीसाठी अर्ज द्यावेत, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.
स्वतंत्र निवडणूक लढवा…
महाविकास आघाडी शिवसेनेच्या ताकदीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होतो. लोकसभेला काँग्रेस पक्ष पुनरूज्जीवित झाला. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते आपल्याला मिळत नाहीत. त्यांचे कार्यकर्ते आपले काम करत नाहीत. हिंदुत्त्वासाठी स्वतंत्र होऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसेनेच्या उमेदवारांनी केली.
याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “काही उमेदावारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदुत्त्वासाठी वेगळे लढण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, आम्ही महाविकास आघाडीतच राहणार आहे.”
हेही वाचा : “बारामती लढली नसती, तर वेगळा संदेश गेला असता”, शरद पवारांच्या विधानावर अजितदादा म्हणाले, “माझ्या भावाच्या…”