आरे कॉलनीत बिबट्याचा पुन्हा एकदा हल्ला; महिला गंभीर जखमी

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये संगीता गुरव यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील (mumbai) गोरेगाव पूर्व भागात असलेल्या आरे कॉलनी (aarey colony) परिसरात बिबट्याने पुन्हा हल्ला करायला सुरुवात केली आहे. आरे कॉलनी मधील आदर्श नगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. या घटनेत महिलेच्या डोक्याला मार लागून ती गंभीर जखमी झाली आहे.

बिबट्याने (Leopard) ज्या महिलेवरहल्ला केला त्या महिलेचे नाव संगीता गुरव (sangita gurav) असे आहे. शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी घरी जात असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला या हल्ल्यात तिच्या डोक्याला मार लागला असून महिला गंभीर जखमी आहे. जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये संगीता गुरव यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दिवाळी दिवशी बिबट्याने घेतला चिमुकलीचा बळी
या घटनेच्या आधीही दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी आरे कॉलनी 15 नंबर युनिटमध्ये बिबट्याने एका दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केला होता, हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सकाळी 6.30 च्यासुमारास दीड वर्षाची मुलगी आईसह दिवाळीचे दिवे लावण्यासाठी घराबाहेर आली होती. दिवे लावल्यानंतर घरामध्ये जात असताना मागून बिबट्याने दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. त्यांनतर या चिमुकलीचा मृतदेह जंगलात सापडला.

पिंजरे लावून दोन बिबट्यांना पकडले
या घटनेनंतर बोरिवली वन विभाग तातडीने कमला लागला आणि पिंजरा लावून दोन बिबट्यांना पकडले. वनविभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी प्रमुख ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. परिसरात 30 कॅमेरे देखील लावण्यात आले त्याद्वारे बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पण तरीही बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

आरे कॉलनीत आठ ते दहा बिबट्यांचा वावर
सध्याच्या घडीला आरे कॉलनी परिसरात आठ ते दहा बिबट्यांचा वावर आहे. आरे कॉलनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडे आणि वस्ती आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका आहे.

आरे- बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास
मुंबईतील हरितक्षेत्र म्हणून आरेची ओळख आहे. आरे पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये आहे. या भागातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळ आहे. हे बिबट्यांचे घर समजले जाते. त्यामुळेच आरे कॉलनीमध्ये बिबट्या दिसणे आणि हल्ले करण्याच्या घटना सारख्या समोर येतात. आरे हा बिबट्यांना नैसर्गिक अधिवास आहे. पण इथे बांधकाम आणि अतिक्रमण वाढल्याने वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.


हे ही वाचा – अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार? प्रतिज्ञापत्राद्वारे सीबीआयचा विरोध