घरमुंबईमुंबईला प्रदूषण व कचरामुक्त करू या, पालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबईला प्रदूषण व कचरामुक्त करू या, पालिका आयुक्तांचे आवाहन

Subscribe

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मुंबई महापालिका मुख्यालय येथे सोमवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुंबईला प्रदूषण व कचरामुक्त करू या, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.

मुंबई – शहराचा इतिहास येथील कला, संस्कृती, शैक्षणिक सुविधा, भौगोलिक महत्त्व, पुरातन वास्तू, पर्यटन स्थळे तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडी यामुळे मुंबई शहराची प्रतिमा जगामध्ये उंचावलेली आहे. सर्व धर्म समभाव जोपासून, मुंबई शहराचा अधिकाधिक विकास होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु या. मुंबईला ‘कचरामुक्त व प्रदुषणमुक्त आणि गतिमान मुंबई बनवूया, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईकरांना केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मुंबई महापालिका मुख्यालय येथे सोमवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी, मार्गदर्शन करताना त्यांनी पालिकेकडून मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सेवासुविधा यांचा उल्लेख करीत आयुक्त इकबाल चहल यांनी वरील आवाहन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा अभियानासाठी मुंबई महापालिकेने, प्रशासकीय यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीबद्दल आणि मुंबईकरांनी घरघरांवर तिरंगा फडकाविल्याबद्दल संपूर्ण मुंबईकरांचे आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

- Advertisement -

मुंबईला कचरामुक्त करण्यासाठी उपाययोजना –

मुंबईला केंद्र व राज्य सरकार यांच्या सहकार्याने कचरामुक्त करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत असल्याची माहिती आयुक्त चहल यांनी यावेळी दिली. शहरातील रस्ते सफाईसाठी पर्यावरण पुरक इ -स्वीपर यंत्रे घेण्याचे काम हाती घेतले आहे. ३५ ई – वाहने परिवहन विभागामार्फत घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच,ओल्या कचऱयाची विकेंद्रकित स्वरुपात विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई शहरात ९ ठिकाणी २ मेट्रिक टन क्षमतेची बायोमिथेशन सयंत्रे उभारण्यासाठी निविदा प्रकिया सुरु आहे. क्षेपणभूमीवरील भार कमी होण्यासाठी विकेंद्रीत स्वरुपात विविध प्रक्रियेव्दारे ओल्या कचऱयावर प्रकिया करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत निर्माण होणाऱया सुमारे ७० टन प्रतिदिन इतक्या घरगुती घातकचऱयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याकरिता पालिकेने ३ प्रकल्प कार्यान्वित केले असून ८ नवीन प्रकल्पांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

देवनार डंपिंग ग्राउंड येथे कचऱयापासून उर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजिले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ६०० टन प्रति दिन क्षमतेच्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन ४ मेगावॅट उर्जा निर्मिती करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे. तसेच, मुलुंड डंपिंग येथे ७ दशलक्ष टन जुन्या कचऱयावर प्रक्रीया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असून डंपिंगची २८ हेक्टर जमीन पुर्नप्राप्त होणार आहे. जुलै २०२२ पर्यंत ९ लाख ९७ हजार टन कचऱयावर प्रक्रिया करुन विल्हेवाट लावण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त यांनी वेळी दिली.

प्रदूषण दूर करून पर्यावरण राखणार –

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करीत आहे. तसेच, गणेशोत्सवामध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शाडूच्या गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करुन पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन पालिका आयुक्त यांनी मुंबईकर नागरिकांना केले. तसेच, पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण करण्याची नितांत आवश्यकता असून, वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष दत्तक योजना’ नागरिकांच्या सक्रीय सहभागाने अंमलात आणण्यात यावी, असे आयुक्त यांनी म्हटले आहे. यावेळी, आयुक्तांनी पालिकेकडून मुंबईकरांना देण्यात येत असलेल्या शिक्षण, पाणी, आरोग्य, स्वच्छता, मलजल प्रक्रिया व्यवस्था, अग्निशमन दल सेवा, कचरा विल्हेवाट, रस्ते, कोस्टल रोड आदी सुविधांबाबतची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -