घरमुंबईयंदा डॉ. आंबेडकरांच्या जयंती दिनी चैत्यभूमीवरुन होणार थेट प्रक्षेपण

यंदा डॉ. आंबेडकरांच्या जयंती दिनी चैत्यभूमीवरुन होणार थेट प्रक्षेपण

Subscribe

अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांनी चैत्यभूमी येथे शुक्रवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली व पालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दादर येथील चैत्यभूमी येथे गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, बाबासाहेबांच्या अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून स्थानिक स्तरावरुन अभिवादन करता यावे यासाठी यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष सोय करण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाला रोखणे आणि कोरोनावरील लसीकरण निर्विघ्नपणे पार पाडणे हे राज्य शासन व मुंबई महापालिका यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यातही लसीच्या तुटवड्यावरून सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात राजकारण सुरू झाले आहे. या परिस्थितीत डॉ. आंबेडकर जयंती शासकीय पद्धतीने कोरोना कालावधीत साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने राज्यशासन व मुंबई महापालिकेतर्फे चैत्यभूमी येथे विविध सेवासुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांनी चैत्यभूमी येथे शुक्रवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली व पालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष व्यवस्थेसह आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. अनुयायांनी यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन जयस्वाल यांनी केले.

- Advertisement -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे १४ एप्रिलला चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून देशभरातून लाखोंच्या संख्यने अनुयायी येतात. त्या पार्श्वभूमीवर, चैत्यभूमीवर वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने पुष्प सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा समावेश असतो. यंदाच्या १३० व्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे सध्या सुरु आहेत. कोरोनाचा पुन्हा वाढलेला धोका पाहता राज्य शासनासह मुंबई महापालिका देखील सतर्क झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जयंती दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना व इतर सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे.

चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच निर्जंतुकीकरण, तपासणी आदी कोविड प्रतिबंधात्मक खबरदारी देखील घेण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून एकत्र येण्यावर असलेल्या निर्बंधांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. यावेळी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, उपआयुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, पोलीस उपआयुक्त प्रणय अशोक, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिर्वाण दिन समन्वय समितीचे महेंद्र साळवे, नागसेन कांबळे व भारतीय बौद्ध महासभेचे प्रदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -