Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईLivestock Census : मोबाईल ॲप्लीकेशनच्या मदतीने पशुगणना; पाळीव, भटक्या प्राण्यांची होणार नोंदणी

Livestock Census : मोबाईल ॲप्लीकेशनच्या मदतीने पशुगणना; पाळीव, भटक्या प्राण्यांची होणार नोंदणी

Subscribe

पशूसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका क्षेत्रात 21 व्या पशुगणनेला 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही पशुगणना सुरू राहणार आहे.

मुंबई : पशूसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका क्षेत्रात 21 व्या पशुगणनेला 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही पशुगणना सुरू राहणार आहे. या पशुगणनेमुळे मुंबईतील गुरेढोरे, भटकी जनावरे, पाळीव प्राणी आदींची निश्चित संख्या कळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांना प्राण्यांचे लसीकरण, रोग निवारण, पशुपक्षी यापासून होणारे रोग (उदा. बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू आदींसारख्या रोगांपासून बचाव, प्रतिबंधात्मक उपाययोजना, त्यांच्यासाठी होणारा खर्च आदिबाबत निश्चित धोरण बनविणे शक्य होणार आहे. देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक डॉ. कलीम पठाण यांनी यासंदर्भातील माहिती दिली. (Livestock census to be conducted in Mumbai with the help of mobile application)

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने दर पाच वर्षांनी पशुधनाची गणना केली जाते. पशूसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका क्षेत्रात मोबाईल ॲप्लीकेशनच्या मदतीने पशुगणना करण्यात येणार आहे. मुंबईत जवळजवळ 500 पेक्षाही जास्त प्रगणक घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन पशूपालकांची घरगुती, घरगुती उद्योग आणि गैर-घरगुती उपक्रम इत्यादींमध्ये वर्गवारी करून त्यांच्याकडील उपलब्ध प्राण्यांच्या प्रजाती (उदा. कुत्री, गुरे, म्हैस, मेंढी, शेळी, कुक्कुट पक्षी) यांची वय, लिंग जातीनुसार मोबाइल ॲप्लीकेशनमध्ये नोंदणी करणार आहेत. त्यामुळे आपल्या घरी पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai News : मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये पुढील पाच दिवस पाणीकपात; कारण काय?

निवडणूक कामामुळे काहीसा विलंब

वास्तविक, मुंबईत 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागले. सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र मुंबई महापालिकेचे आयुक्त, चार अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींसह जवळजवळ 60 अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त होते. त्यामुळे आता निवडणुका पार पडल्या असून निकालही जाहीर झाल्याने महापालिका अधिकारी, कर्मचारी वर्गाला काहीशी उसंत मिळाली आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात मनुष्यबळ हे मुंबईतील पशुगणना करण्यासाठी कार्यरत होणार आहे.

- Advertisement -

पशुगणना करण्यासाठी विशेष प्रशिक्षण

पशुगणना कामासाठी पालिका आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना विशेष प्रकारचे प्रशिक्षण तज्ज्ञांमार्फत देण्यात आले आहे. तसेच, ही पशुगणना मोबाईल ॲप्लीकेशनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे अचूक पद्धतीने पशुगणना होणार आहे. या प्रगणकाना केंद्र शासनाकडून विशेष ओळखपत्र देण्यात येणार आहे.

हेही वाचा –Ajit Pawar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

पशुगणनेमागील मूळ उद्देश

केंद्र, राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्राण्यांचे लसीकरण, रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार आदी बाबींसाठी काही कोटींचा निधी खर्च करते. स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू आदिंसारखे रोग उद्भवल्यास आवश्यक उपाययोजना आणि औषधोपचार करणे आदींबाबत केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका पुढाकार घेते. प्राण्यांची शासन, महापालिका कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक असते. मात्र तरीही या प्राण्यांची अधिकृतपणे नोंदणी करण्यात येत नसल्याचे शासन व महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पशुगणनाद्वारे प्राण्यांची निश्चित आकडेवारी समजणार आहे. त्यामुळे केंद्र, राज्य आणि महापालिका यांना प्राण्यांबद्दल निश्चित असे धोरण तयार करता येणार आहे. तसेच, या पशुगणनाद्वारे प्राण्यांची एकूण संख्या, त्यांचे जन्म, मृत्यूचे निश्चित प्रमाण, संख्यावारी, त्यांच्या जीवनमानावर आवश्यक निधी खर्च करणे आदींबाबत व्यवस्थित नियोजन करून त्याची ठोसपणे अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -