ठाण्यात पुन्हा लागू होणार लॉकडाऊन, कंटेनमेंट झोनची यादी तयार!

Lockdown
लॉकडाऊन

गेल्या काही दिवसांपासून ठाण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. आजघडीला ठाण्यात एकूण ४ हजार ७२ अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून ३ हजार ८१९ रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आलं आहे. ठाण्यात कोरोनामुळे आजपर्यंत २७७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये गेल्या २४ तासांत १४ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे ठाण्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आला आहे. ज्या ज्या भागात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्या भागांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. अशा भागांची यादी प्रशासनाने तयार केली असून या ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्याची तयारी देखील पूर्ण झाली आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी

ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात निवेदन देणारा व्हिडिओ जारी केला असून त्यात ही सर्व माहिती त्यांनी दिली आहे. ‘लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने बाहेर आले आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे लॉककडाऊन जाहीर करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत’, असं ते म्हणाले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या ज्या भागात लॉकडाऊन जाहीर होणार आहे, त्या भागांची यादी देखील दिली आहे. ‘नागरिकांना विनंती आहे की जीवनावश्यक बाबींची खरेदी करून ठेवावी. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. यासंदर्भात पालिका आयुक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील’, असं देशमुख यांनी सांगितलं आहे.

thane corona patients

ठाण्यात कुठे होणार लॉकडाऊन?

बाळकुंभ, कोळशेत, ढोकाई, राम मारुती नगर, मानपाडा, घोडबंदरचा काही भाग, नौपाड्यातील काही हॉटस्पॉट, वागळे इस्टेट, किसन नगर, शांतीनगर, पडवळ नगर, वारली पाडा, कैलास नगर, राम नगर, सिपी तलाव, इंदिरा नगर, सावरकर नगर, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा

ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा काही विभागात कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे, पालक मंत्री, ठाणे

ठाणे जिल्ह्यात आज दिवसभरात १३४५ कोरोना रुग्ण सापडले असून जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजार २८९ इतका झाला आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यात आज ३८ मृत्यू झाले असून एकूण मृतांचा आकडा ९८५ इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यातली आजची कोरोनाबाधितांची सविस्तर आकडेवारी…

ठाणे शहर

आजचे रुग्ण – ३४१
एकूण रुग्ण – ८१६८
आजचे मृत्यू – १४
एकूण मृत्यू – २९६

कल्याण-डोंबिवली

आजचे रुग्ण – ३६९
एकूण रुग्ण – ५६७८
आजचे मृत्यू – ६
एकूण मृत्यू – १०७

भिवंडी

आजचे रुग्ण – ५०
एकूण रुग्ण – १७४०
आजचे मृत्यू – ३
एकूण मृत्यू – १००

अंबरनाथ

आजचे रुग्ण – ४५
एकूण रुग्ण – १६८१
आजचे मृत्यू – २
एकूण मृत्यू – ४०

उल्हासनगर

आजचे रुग्ण – १०१
एकूण रुग्ण – १६२९
आजचे मृत्यू – २
एकूण मृत्यू – ४१

बदलापूर

आजचे रुग्ण – ३५
एकूण रुग्ण – ७२१
आजचे मृत्यू – ०
एकूण मृत्यू – १५

मिरा-भाईंदर

आजचे रुग्ण – ११६
एकूण रुग्ण – ३०५१
आजचे मृत्यू – ४
एकूण मृत्यू – २१३९

नवी मुंबई

आजचे रुग्ण – १९७
एकूण रुग्ण – ६२००
आजचे मृत्यू – ४
एकूण मृत्यू – २०५

ठाणे ग्रामीण

आजचे रुग्ण – ९१
एकूण रुग्ण – १४२१
आजचे मृत्यू – ३
एकूण मृत्यू – ४२